व्हॉट्सॲपला टक्कर देणार ‘संदेस’; जाणून घ्या फीचर्स

संदेस अ‍ॅप हे ओपन सोर्स व्यासपीठ असून ते पूर्णपणे सुरक्षित आहे. यासोबतच याचे संपूर्ण नियंत्रण केंद्र सरकारच्या अखत्यारित असणार आहे. वन-टू-वन, ग्रूप मेसेजिंग, फाईल आणि मीडिया शेअरिंग, ऑडिओ-व्हीडिओ कॉल आणि ई-गव्ह अ‍ॅप्लिकेशन इत्यादी सुविधा संदेस अ‍ॅपमध्ये उपलब्ध असणार आहेत.

    व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी भारत सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारकडून संदेस हे भारतीय मेसेजिंग अ‍ॅप लॉन्च केले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘संदेस अ‍ॅप’बाबतची लेखी स्वरुपात माहिती संसदेत सादर केली. पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेले संदेस अ‍ॅप फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅप या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपला एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

    व्हॉट्सअ‍ॅपच्याच कार्यपद्धतीप्रमाणेच संदेस अ‍ॅपदेखील काम करणार आहे. त्यामुळे युजर्सला अ‍ॅप वापरण्यात कोणतीही अडचण येणार नाही. संदेस अ‍ॅप हे सध्या सरकारी कर्मचारी आणि सरकारशी निगडीत इतर कंपन्यांचे कर्मचारी प्रायोगिक तत्त्वावर वापर करत असल्याचीही माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

    संदेस अ‍ॅप हे ओपन सोर्स व्यासपीठ असून ते पूर्णपणे सुरक्षित आहे. यासोबतच याचे संपूर्ण नियंत्रण केंद्र सरकारच्या अखत्यारित असणार आहे. वन-टू-वन, ग्रूप मेसेजिंग, फाईल आणि मीडिया शेअरिंग, ऑडिओ-व्हीडिओ कॉल आणि ई-गव्ह अ‍ॅप्लिकेशन इत्यादी सुविधा संदेस अ‍ॅपमध्ये उपलब्ध असणार आहेत. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे, असेही सांगण्यात येत आहे. संदेस अ‍ॅप हे भारतीय मोबाईल अ‍ॅप्लिकेशनला प्रोत्साहन देण्यासाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर या सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशन्स आणि केंद्र सरकारमध्ये नव्या नियमांच्या अंमलबजावणीवरून वाद सुरू आहे.