‘आधारपे’ आणि रोख यांच्याद्वारे व्यवहार करण्यास महिला ग्राहकांचे सर्वाधिक प्राधान्य; पेनीअरबायचे सर्वेक्षण

रोखीने व्यवहार करण्यालाच अजूनही सर्वाधिक पसंती असून, ‘आधार पे’, ‘यूपीआय’ आणि ‘डेबिट कार्ड्स’ या माध्यमांनाही वेगवेगळ्या वयोगटातील ५ ते १५ टक्के महिलांनी काही प्रमाणात स्वीकारले आहे. ‘रिटेल टच पॉईंट्स’वर महिला ग्राहकांनी घेतलेल्या सेवांमध्ये पहिल्या तीन क्रमांकांत रोख पैसे काढणे, मोबाईल रिचार्ज आणि बिलांचे पेमेंट यांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.

  • “महिलांचा डिजिटल स्वातंत्र्याचा निर्देशांक - रिटेल आऊटलेट्समधील महिलांच्या आर्थिक व्यवहारांचा देशभरातील अहवाल” ‘पेनीअरबाय’कडून प्रसिद्ध
  • ६५ टक्क्यांहून अधिक महिला अजूनही रोख व्यवहार करण्यास देतात प्राधान्य, त्यानंतर अनुक्रमे ‘आधार पे’, ‘यूपीआय क्यूआर’ आणि ‘कार्ड’ यांच्याद्वारे पेमेंटला देतात पसंती
  • रिटेल दुकानांमध्ये डिजिटल पद्धतींनी आर्थिक व्यवहार करणाऱ्या बहुसंख्य महिलांचा वयोगट ३१ ते ४० वर्षे इतका
  • रोख रक्कम काढणे, बिल भरणे आणि मोबाईल रिचार्ज - महिला ग्राहकांनी ‘पेनीअरबाय एजंट आउटलेट’मध्ये मिळविलेल्या प्राधान्याच्या तीन सेवा
  • दरमहा ५०० ते ७५० रुपयांची सूक्ष्म स्वरुपाची बचत करण्याकडे महिलांचा कल
  • पैसे काढताना सामान्यतः १००० ते २५०० रुपये इतकी रक्कम काढण्याची पद्धत
  • बचतीच्या उद्दिष्टांमध्ये, मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य, त्यानंतर सोनेखरेदी

मुंबई : देशातील सुमारे ६५ टक्के महिला व्यवहार करतेवेळी रोख रकमेला प्राधान्य देतात. त्यानंतर त्या ‘आधारपे’ वगैरेसारख्या माध्यमांचा विचार करतात. यावरून भारतात पेमेंटच्या क्षेत्रात रोखीचे प्राबल्य कायम आहे. ‘पेनीअरबाय’ या देशातील सर्वात मोठ्या शाखाविहीन बँकिंग नेटवर्कतर्फे करण्यात आलेल्या एका अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. “महिलांचा डिजिटल स्वातंत्र्याचा निर्देशांक – रिटेल आऊटलेट्समधील महिलांच्या आर्थिक व्यवहारांचा देशभरातील अहवाल” या शीर्षकाचा हा विश्लेषणात्मक अभ्यास ‘पेनीअरबाय’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे.

कंपनीने देशभरातील ३५०० हून अधिक दुकानांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार हा अहवाल तयार करण्यात आला. या रिटेल दुकानांमध्ये महिला ग्राहक करीत असलेल्या व्यवहारांची नोंद या सर्वेक्षणात करण्यात आली.

अहवालानुसार, सर्वेक्षण झालेल्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त रिटेल विक्रेत्यांनी नमूद केले, की ३१ ते ४० या वयोगटातील महिला डिजिटल व्यवहार करण्यात सर्वात जास्त पटाईत आहेत. दुकानांमध्ये खरेदी करणाऱ्या या वयोगटातील महिलांचे प्रमाण ५८ टक्के आहे.

त्यानंतरचा गट हा २० ते ३० वयाचा आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये व महानगरांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचे प्रमाण मोठे असताना, तेथील आर्थिक व्यवहार करणाऱ्या सुमारे २५ टक्के महिला ग्राहक या २० ते ३० वयोगटातील होत्या.

रोखीने व्यवहार करण्यालाच अजूनही सर्वाधिक पसंती असून, ‘आधार पे’, ‘यूपीआय’ आणि ‘डेबिट कार्ड्स’ या माध्यमांनाही वेगवेगळ्या वयोगटातील ५ ते १५ टक्के महिलांनी काही प्रमाणात स्वीकारले आहे. ‘रिटेल टच पॉईंट्स’वर महिला ग्राहकांनी घेतलेल्या सेवांमध्ये पहिल्या तीन क्रमांकांत रोख पैसे काढणे, मोबाईल रिचार्ज आणि बिलांचे पेमेंट यांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. शहरी आणि मेट्रो भागांतील केंद्रांवर पैसे पाठविण्याचे व्यवहारही मोठ्या प्रमाणावर झाले. हे व्यवहार मुख्यत: ३१-४० वर्षे (४५ टक्के) व २०-३० वर्षे (२५ टक्के) वयोगटातील तरुण, नोकरी करणाऱ्या महिलांनी केले.

पैसे काढण्याचे (विथड्रॉवल) प्रमाण तिसऱ्या श्रेणीतील शहरे व ग्रामीण भागांत जास्त असल्याचे आढळले. हे व्यवहार करणाऱ्यांत ३१-४० वर्षे (६५ टक्के) वयोगटातील महिलांचे प्रमाण मोठे आहे. तिसऱ्या श्रेणीतील शहरे व ग्रामीण भाग येथील 78 टक्के महिलांनी पैसे काढण्याचे व्यवहार केले. एकूण देशभरात, महिलांनी पैसे काढण्याचे जे व्यवहार केले, त्यांत १००० ते २५०० रुपये या रकमांचे प्रमाण सर्वात जास्त होते.

अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे, की ७६ टक्के महिला आपले बॅंकेचे खाते स्वतःच चालवितात. ही खाती प्रामुख्याने पैसे भरणे व पैसे काढणे याच कामांसाठी वापरली जातात. विमा (५ टक्क्यांहून कमी) आणि बचत खाते (१२ टक्क्यांहून कमी) या सेवा महिलांकडून अतिशय कमी प्रमाणात वापरल्या जातात. विशेष म्हणजे २० टक्क्यांहून अधिक महिलांनी आपले पतीच आपले बॅंकेचे खाते चालवीत असल्याची कबुली दिली आहे.

या अहवालातील निष्कर्षांविषयी माहिती देताना ‘पेनीअरबाय’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुमार बजाज म्हणाले, “आपला देश डिजिटल क्रांतीतून जात आहे. २० ते ४० वयोगटातील महिला देशातील रिटेल दुकानांमध्ये व्यवहार करताना सूक्ष्म डिजिटल व्यवहार करतात, हे पाहून आम्हाला आनंद होतो. कोणाचे तरी सहाय्य घेण्यापासून ते स्वतः सर्व गोष्टी करण्यापर्यंतचा महिलांचा हा प्रवास या परिसंस्थेमध्ये टिकून राहणे आवश्यक आहे. आपल्या महिला ‘आधार पे’ आणि ‘यूपीआय क्यूआर’ यांच्या माध्यमातून व्यवहार करून डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत आणि परिवर्तन घडवून आणत आहेत, हे पाहताना समाधान वाटते. तरुण व्यक्ती डिजिटल स्वरुपाचे आर्थिक व्यवहार सुरू करतात, तेव्हा त्यांचे जीवन सुलभ बनतेच, त्याशिवाय, उत्क्रांतीसाठी एक मजबूत पायाही तयार होतो.”

“अभ्यासानुसार हे दिसून आले आहे की संकटांच्या दिवसांसाठी तरतूद म्हणून बचत करण्याबाबत महिला ग्राहकांमध्ये कोविडनंतरच्या काळात जागरूकता वाढत गेली आहे. ३२ टक्के महिलांनी बचत करणे यालाच आपले प्राधान्य असल्याचे म्हटले आहे; तथापि, घरात अनौपचारिकपणे बचत करण्याकडेच या महिलांचा कल असतो. औपचारिकपणे (बॅंकांमध्ये) बचत करण्याविषयी जागरूक असलेल्या महिलांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी आहे. यामध्ये बदल व्हावा आणि प्रत्येक घरात औपचारिक बचतीची सवय रुजावी, याकरीता सर्व भागधारकांनी समन्वित प्रयत्न करण्याची गरज आहे. या प्रयत्नांमध्ये हातभार लावण्यास ‘पेनीअरबाय’ची कटिबद्धता कायम आहे.”

ते पुढे म्हणाले, “महिलांना पेमेंटच्या डिजिटल पद्धतींविषयी परिचित केल्यानेच त्यांच्या खात्यांची संपूर्ण मालकी त्यांच्या स्वतःकडेच राहण्यास मदत होईल. खर्च करणे किंवा ‘डिजिटल कॉमर्स’चे व ‘इन्फोटेन्मेंट’चे व्यवहार करणे यासाठी डिजिटल मदत घेतल्यास, महिलांच्या वेळेची व पैशांचीही बचत होईल आणि त्यांतून त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. देशातील सर्व किराणा दुकानांमध्ये डिजिटल पेमेंट पर्यायांचा वापर करण्यासाठी तेथे विशिष्ट सुविधा निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. जेणेकरून, आपली जनता, विशेषत: महिला लवकरच देशात अस्तित्वात असलेली डिजिटल दरी सांधण्याचे काम करू शकतील.”

“आर्थिक समावेशनाच्या माध्यमातूनच स्त्रियांचे सबलीकरण होईल, त्यांना स्वतःचे उत्पन्न व बचत यांवर नियंत्रण राखता येईल. आमचा ‘डिजिटल नारी’ उपक्रम असो अथवा महिलांना वापरण्यास सुलभ असे बचतीवर आधारीत सोल्यूशन असो, ‘पेनीअरबाय’मध्ये आम्ही नेहमीच महिलांच्या आर्थिक समावेशनाला चालना देण्याचे काम केले आहे. आमचा विश्वास आहे की आर्थिक सबलीकरणातून लैंगिक समानतेलाही चालना मिळण्यास मदत होईल.”

आर्थिक व्यवहारांसाठी किराणा आणि रिटेल दुकानांत जाणाऱ्या सुमारे ३२ टक्के महिला स्मार्टफोनचा उपयोग करतात आणि व्हॉट्सअ‍ॅपचादेखील त्या उत्साहाने वापर करतात, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. हे प्रमाण शहरांमध्ये ५० ते ६० टक्के इतके जास्त आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण चांगले आहे. देशाच्या ग्रामीण भागात हे स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण दोन अंकी टक्क्यांवर गेले आहे. किराणा दुकानांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी जाणाऱ्या महिला ग्राहकांमध्ये डिजिटल सेवा वापरण्याचे प्रमाण वाढत असल्याचे यावरून दिसून येते.

भविष्यातील गुंतवणूकींसंदर्भात पहिल्या तीन उद्दिष्टांविषयी विचारले असता, महिलांनी मुलांच्या शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिले, त्यानंतर मालमतांमध्ये गुंतवणूक, सोनेखरेदी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी यांना पसंती दर्शविली. कोविडनंतरच्या काळात आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष तरतूद करण्यासही अनेक महिलांनी प्राधान्य दिले आहे. दरमहा ५०० ते ७५० रुपये बचत आपण करीत असतो, असे ५१ टक्के महिलांनी सांगितले.

विमा या सेवेबद्दलची जागरुकता केवळ ५ टक्के महिलांमध्येच आढळली. निमशहरी व ग्रामीण भागांत ही जागरुकता वाढण्याची गरज अहवालात नमूद करण्यात आली आहे. अर्थात काही जाणकार महिलांनी सर्वेक्षणास प्रतिसाद देताना, आयुर्विमा व त्यानंतर आरोग्यविमा असे आपले प्राधान्यक्रम असल्याचेही सांगितले.