दोन वर्षानंतर पुन्हा वाजली शाळेची घंटा! विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण

कोरोनाच्या संकटावर आपण हळूहळू मात करत ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. आता ‘सीमोल्लंघन’मुळं हळूहळू सकारात्मक बदल होतोय, आणि सर्व क्षेत्र पहिल्यासारखी खुली होत आहेत. त्यामुळं नवरात्रौत्सवाच्या या पाशर्वभूमीवर कोरोनाच्या सर्व परिस्थितीवर आपण मात करत ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. त्यामुळं आपणाला पहिल्यासारखे दिवस येतील अशी आशा आहे. दरम्यान राज्यातील शाळा सुरु होत असल्यामुळं विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षणसंस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

    नवरात्रौत्सवाच्या या पाशर्वभूमीवर कोरोना संकटावर आपण मात करत ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. कोरोना ह्या जागतिक महामारीमुळं मागील दिड-दोन वर्षापासून सर्व काही ठप्प झाले होते. याच कालावधीत शाळा सुद्धा कुलुपबंद होत्या. परंतू या कोरोनाच्या संकटावर आपण हळूहळू मात करत ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. आता ‘सीमोल्लंघन’मुळं हळूहळू सकारात्मक बदल होतोय, आणि सर्व क्षेत्र पहिल्यासारखी खुली होत आहेत. त्यामुळं नवरात्रौत्सवाच्या या पाशर्वभूमीवर कोरोनाच्या सर्व परिस्थितीवर आपण मात करत ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. त्यामुळं आपणाला पहिल्यासारखे दिवस येतील अशी आशा आहे. दरम्यान राज्यातील शाळा सुरु होत असल्यामुळं विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षणसंस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. कोरोनाने एवढे भीषण थैमान मांडले होते की, जगातील कृषी क्षेत्र वगळता सर्वंच क्षेत्रं ठप्प झाली होती. कोरोनावर आळा घालण्यासाठी २२ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय किंवा अडथळा येऊ नये, विद्यार्थी हा शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहू नये, म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अवलंबण्यात आला. काय गंमत आहे बघा, मुलांनी मोबाईलच्या आहारी जाऊ नये म्हणून जे पालक मुलांच्या हातात मोबाईल देत नव्हते, तेच पालक शाळेतून येणारा ऑनलाईन अभ्यासासाठी मुलांना मोबाईल देत, ऑनलाईन अभ्यासासाठी आग्रही राहिले. मागील दिड- दोन वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाल्याचे आपण पाहिले. मागील दिड-दोन वर्षापासून बंद असणारी शाळा, मुलांचा किलबिलाट आणि मुलांना हवीहवीशी वाटणारी शाळेची घंटा पुन्हा एकादा वाजायला सुरुवात झाली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, राज्य सरकारने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील शाळाही ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी व शहरी भागातील ८ वी ते १२ पर्यंतच्या कुलुपबंद असलेल्या शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. दीड वर्षांनंतर शाळा सुरू झाल्यामुळं विद्यार्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

     “आपल्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा भेटायला मिळणार, शाळेतील जी दंगामस्ती आम्ही मिस्स करत होतो, ती दंगामस्ती करणार, आम्ही एकत्र दिड वर्षातील अनुभव ऐकमेकांना शेअर करणार, एकत्र मैदानावर खेळणार, जाम धमाल, मस्ती करणार ग्रुपने सेल्फी काढणार, असं दादरमधील साने गुरुजी शाळेतील विद्यार्थांनी शाळेच्या पहिल्या दिवशी सांगितले.

    तर दुसरीकडे दिड-दोन वर्षानंतर शाळा सुरु झाल्या असल्या तरी, आपण आरोग्याची काळजी घेत सीमोल्लंघन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांची यापुढे नियमित तपासणी मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटरने तपासणी केली पाहिजे. विद्यार्थ्यांना ताप, खोकला आहे का? हे शाळांनी पाहिले पाहिजे,  विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि काळजी शाळांनी घेतली पाहिजे असं मुंबईतील पालकांनी म्हटले आहे.यामुळं कोरोनावर आपण मात करत जरी ‘सीमोल्लंघन’ करत असलो तरी शासनाचे नियम पाळत, आरोग्याची काळजी घेत हळूहळू ‘सीमोल्लंघन’ केलं पाहिजे. शाळा सुरु झाल्यांनंतर अनेक शाळांनी कोरोनाचे नियम पाळत शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शाळांवर असल्याने शाळांनी सुद्धा आपण आरोग्याची काळजी घेत ‘सीमोल्लंघन’ करत आहोत असं म्हटलं आहे. आम्ही आरोग्याची काळजी घेत, मुलांची सुरक्षितता, सोशल डिस्सटिंन्सिंग, सॅनिटायझर, एका बाकावर एकच विद्यार्थी, एका वर्गात फक्त २५ विद्यार्थी, दररोज मुलांची तपासणी, सर्दी, ताप, खोकला याची तपासणी इत्यादीची काळजी आम्ही घेत आहोत असं लालबाग, परळ येथील पालिका शाळांनी म्हटलं आहे

    मागील दिड-दोन वर्षात काय घडले

    २२ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनचा फटका जसा विविध क्षेत्रांना बसला, तसा तो शाळांना सुद्धा बसला. शाळा बंद असल्यामुळं विद्यार्थांचे कसे होणार हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत होता. विद्यार्थ्यांने वर्ष वाया जाऊ नये आणि मुलं ही अभ्यासाच्या वातावरणात, अभ्यासाच्या प्रक्रियेत राहावी म्हणून ऑनलाईन अभ्यासाचा पर्याय शाळांनी सुचविला. परंतू  ऑनलाईन अभ्यासक्रम कितपत योग्य आहे? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. ऑनलाईन अभ्यासक्रम यावर बराच वाद झाला. मत-मतांतरे झाडली गेली. काहींना तर असे म्हटले की, ‘शाळांना फि हवी’ म्हणून ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय शाळांनी निवडला, अशी टिका सुद्धा करण्यात आली.

    ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी सर्व साधने शहरातील मुलांकडे होती किंवा आहेत. परंतु ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कष्टकरी अशिक्षित पालकांच्या मुलांचे काय? त्यांच्याकडे लागणारे स्मार्ट फोन, नेटवर्क, तांत्रिक बाबी ह्या कश्या काय उपलब्ध होणार? त्यामुळं कोरोनाकाळातील ऑनलाईन अभ्यासक्रम हा अजूनही एक वादाचा विषय आहे. दरम्यान कोरोनाच्या कालावधीतील फि शाळांनी घ्यावी की, नाही हा मुद्दा आजही न्यायप्रविष्ट आहे, कोरोना महामारीमुळं देशातील अनेकांचे रोजगार गेले त्यामुळे शाळांची फि भरायची कशी? असा पालकांची भूमिका आहे. तर शाळांनी फक्त ५० टक्के फि घ्यावी असं सुद्धा काही पालकांनी म्हटलेय. याच कालावधीत शाळांच्या फि विरोधात मोर्चे, आंदोलने काढण्यात आले. तर मुलांना शाळेत पाठवले तर, मुलांच्या सुरक्षितेची जबाबदारी कोण घेणार? असा सुद्धा सूर ऐकायला मिळाला. कोरोना काळातील फि शाळांना दयायची की नाही. यावरुन न्यायालय, शासन, प्रशासन, शिक्षणसंस्था, पालक आणि शिक्षकांची वेगवेगळी मते आपण मागील दिड दोन वर्षात ऐकली आणि पाहिली सुद्धा.

    शाळांचे प्राधान्य ऑनलाईन शिक्षणास

    लॉकडाऊनमुळं सर्रास शाळांनी सगळे वर्ग गुगल मीट किंवा झूमवर घेतले. मात्र दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्शनच्या समस्या आजही आहेत. कोरोनामुळं भारतातले प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ पातळीपर्यंत ३३ कोटी पेक्षा जास्त विद्यार्थी कोरोनामुळं घरी बसून होते. जगभरातल्या ७० टक्के विद्यार्थ्यांवर लॉकडाऊनचा परिणाम झाल्याचे एका सर्वेमधून समोर आले आहे. भारतासारख्या देशात आजही फक्त २३-२४ टक्के लोकांच्या घरीच इंटरनेट उपलब्ध आहे. असं असताना शहरापासून दुर्गम ग्रामीण भागांपर्यंत सगळ्यांना समान शिक्षण मिळाले का? हा एक अनुत्तरीच प्रश्न आहे. ‘युनेस्को’च्या अहवालानुसार एप्रिल २०२०मध्ये १८८ देशांत १५४ कोटी विद्यार्थी घरी बसले होते. भारतात १५ लाख शाळा बंद होत्या. त्यामुळे २६ कोटी विद्यार्थी व ८९ लाख शिक्षक घरी बसून होते. तर उच्च शिक्षणात ५० हजार शिक्षणसंस्था बंद होत्या. दूरशिक्षण, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, यू-ट्यूब, मल्टिमीडिया, मोबाइल फोन, ई-लायब्ररी, दूरदर्शन इत्यादींच्या माध्यमांतून अनेक देशांनी तातडीने, मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, म्हणून वरील प्रकारचे उपक्रम सुरू केले आहेत. याउलट भारतात चित्र दिसले. भारतात मात्र परीक्षा रद्द करणे, परीक्षा पुढे ढकलणे, परीक्षा न घेता मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे एवढ्यापुरतेच निर्णय घेतले गेल्याचे आपण पाहिले. कोरोनाचा शिक्षण क्षेत्रावर खूप मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं स्वाभाविकपणे अनेक शिक्षणसंस्थांनी ऑफलाईन शिक्षणप्रणालीपेक्षा ऑनलाईल शिक्षणास प्राधान्य दिल्याचे मागील दिड-दोन वर्षात दिसून आले. कनेक्शन व्यवस्थित आहे की नाही हा एक वेगळा मुद्दा मात्र वादातीत आहे.

    कोरोना काळातील नवीन शैक्षणिक धोरण

    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २९ जुलै २०२० रोजी नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरण देशात तब्बल ३४ वर्षानंतर आलं. १९८६ रोजी पहिलं शैक्षणिक धोरण देशात लागू झालं होतं. त्यानंतर १९९२ मध्ये या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले. २००९ मध्ये शिक्षण हक्क कायदा आणला गेला ज्याची अंमलबजावणी २०१३ पासून करण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आलेत.

    शालेय शिक्षणाचं स्वरुप आतापर्यंत १०+२ असं होतं. पण या शैक्षणिक मसुद्यात दहावीची परीक्षा ही बोर्डाची असेल, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याऐवजी ५+३+३+४ ही नवी शिक्षण प्रणाली सुचवण्यात आली.

    यानुसार पहिल्या टप्प्यात म्हणजेच पहिल्या पाच वर्षात – पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरीचे शिक्षण देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात – इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण असेल. तिसऱ्या टप्प्यात – सहावी ते आठवीपर्यंत शिकवण्यात येईल.चौथ्या टप्प्यात – उर्वरित चार वर्ष म्हणजे नववी ते बारावीपर्यंतचं शिक्षण असेल. यामध्ये बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार असून, वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जाणार आहे. सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे, तसंच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचाही विचार आहे. शिक्षण व्यवस्थेत पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक शाळेसाठी अभ्यासक्रम ठरवला गेला. इत्यादी बदल शिक्षण क्षेत्रात कोरोना काळात आपण पाहिले.

    कोरोना पूर्व काळातील शाळा

    कोरोना पूर्व काळातील शैक्षणिक वर्षे आणि आत्ताचे ऑनलाईन शिक्षण यात खूप फरक आहे. कोरोना पूर्व काळातील प्रत्यक्ष शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होत होता. विविध परिक्षांमुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता समजून येत होती. महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकास होतो. त्यांच्या आत्मविश्वास वाढीस लागतो, शिक्षणाची व वाचणाची ओढ निर्माण होते. प्रत्यक्ष मुलांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या जातात, विद्यार्थी  थेट ऐकमेकांशी संवाद साधत त्यामुळं स्वाभाविकपणे त्यांच्या ज्ञानात भर पडे. परंतू कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणामुळं मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत होता, मुलांची शारिरिक हालचाल होत नसे. सतत ऑनलाईन अभ्यासामुळं मुलांच्या डोळ्यांना त्रास होत असे. त्यामुळं आता प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यामुळं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कारण चार भिंतीतील शाळेची मज्या काही औरच.

    पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली

    मागील दिड- दोन वर्षापासून बंद असणारी शाळा राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील शाळाही ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं कुलुपबंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. शिक्षकांनी कोरोनाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांचे सॅनिटायझेशन करून त्यांना शाळेत प्रवेश दिला. पालकांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी शाळेतर्फे जनजागृतीही करण्यात येत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी फुले आणि पेढे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. दीड वर्षांनंतर शाळा सुरू होत असल्याने शाळेचा पहिला दिवस हा शिक्षणोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी शाळांकडून घेण्यात येत आहे. शाळांनी एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्याचे नियोजन करून एका वर्गात किमान २५ विद्यार्थीच बसतील अशी व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने शाळा टप्प्याटप्प्याने तीन सत्रात भरविण्याचेही नियोजन केले आहे. ऑनलाईन अभ्यासापासून सुटका झाली, आता शाळेत अभ्यास करायला मिळेल त्यामुळे खूप आनंद होत असल्याचे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. राज्य सरकारच्या कोविड नियमावलीनुसार, विद्यार्थ्यांची यापुढे नियमित तपासणी मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटरने तपासणी केली. विद्यार्थ्यांना ताप, खोकला नाही ना? याबाबत शिक्षकांमार्फत चौकशी केली. विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही आमची जबाबदारी असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या ७५५ शाळांमध्ये इयत्ता ८ वी ते १० वीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यातील ३२ हजार ७६४ शाळांपैकी २७ हजार ४४९ शाळांमधील वर्ग सुरू झालेत. यामध्ये ग्रामीण भागातील २१ हजार ९२५ शाळांमध्ये ३९ लाख ९ हजार ८०१ विद्यार्थ्यांपैकी २० लाख १० लाख ५८५ विद्यार्थी उपस्थित होते. तर शहरी भागातील १५ लाख ३५ हजार ५८१ विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ५६ हजार ९९९ विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील दंगामस्तीला दीड वर्षांपासून मुकलेल्या मुलांच्या शाळेची घंटा अखेर वाजली. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दीड वर्षांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत आहे. ज्या गोष्टी मिस्स केल्या त्या पुन्हा अनुभवायला मिळणार असल्याचे विद्यार्थांमध्ये उत्साहाचे वातावरण सध्या आहे.