वणीची अनोखी जगदंबा! : वेशीवरच्या पाऊलखुणा 

वणीत एक ताम्रपट असल्याचे म्हटले जाते, मात्र तो कोणाकडे आहे? त्याचे वाचन झाले आहे की नाही याबाबत काहीच माहिती मिळत नाही. मात्र वणी येथे मिळालेला एक ताम्रपट सध्या मुंबई येथील बॉम्बे ब्रँच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटीकडे आहे. हा ताम्रपट राष्ट्रकूटकाळातील राजा गोविंद (तृतीय : इ.स. ७९४ ते इ.स. ८१४ ) याचा आहे. राष्ट्रकुटातील पराक्रमी राजा म्हणून तृतीय गोविंदने नाव कमावले होते.

  प्रविण दोशी,वणी : एखाद्या ठिकाणचा इतिहास प्राचीन असला की, त्या ठिकाणचा इतिहास समजून घेण्याची साधने त्रोटक होत जातात. त्यामुळे अनेकदा पिढ्यान‌् प‌िढ्या सांगितल्या गेलेल्या लोककथांतून अख्यायिका तयार होतात. श्रद्धेपोटी अन‌् संस्कारांच्या हेतूने त्या तळमळीने जपल्याही जातात. असेच काहीसे वणी या गावाविषयी झाले आहे. राष्ट्रकुटातील पराक्रमी राजा म्हणून ओळखला गेलेला गोविंद राजा (तृतीय) मुळे वणीच्या इतिहासाला सोनेरी स्पर्श लाभला आहे. मात्र त्याच्या खाणाखुणा आता एका ताम्रपटाभोवती फिरतात, तर सप्तश्रृंगी देवीची बहीण अथवा मूळ रूप समजले जाणारी जगदंबा देवी आपल्या अनोख्या रूपाने वणीचे प्राचीनत्व सिद्ध करते अन‌् शक्तीपीठाचे महत्त्व वाढविताना दिसते.

  साडेतीन पीठांपैकी अर्ध शक्तीपीठ
  नाशिकपासून अवघ्या दीड तासांवर नाशिक-सापुतारा रस्त्यावर व महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी वणी वसले आहे. बांबूच्या घनदाट वनाच्या वन या शब्दाचा अपभ्रंश होऊन वणी हे नाव पडले. वणी गडावरील सप्तश्रृंगी देवीला महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्ध्या शक्तीपीठाचा दर्जा मिळाल्याने गावाने केव्हाच कुस बदलली आहे. सततच्या भक्तांच्या सहवासामुळे हे गाव समृद्ध झाले आहे.
  वणीपासून सप्तश्रृंगीगड साधारण पुढे पंधरा किलोमीटरवर आहे. सप्तशृंगी गडावरील महिषासूरमर्दिनीचे दर्शन घेऊन अनेक भाविक पुन्हा जगदंबेच्या दर्शनासाठी वणी गावात येतात. वणी तीर्थक्षेत्री जगदंबा देवीचे सुंदर मंदिर आहे. गडावर दर्शन आटोपून वणीच्या जगदंबेचे दर्शन घेतल्याशिवाय पुण्य लाभत नाही, अशी अख्यायिका आहे. वणीची जगदंबा ही सप्तश्रृंगी देवेचे मूळ रूप असल्याचे म्हटले जाते. अनेक जण जगदंबा सप्तश्रृंगीची बहीण असल्याचाही दावा करतात.

  अशी आहे आख्यायिका 
  महिषासुराच्या त्रासाला कंटाळलेल्या भक्तांना या राक्षसापासून मुक्ती देण्यासाठी वणीतील जगदंबेने सप्तश्रृंगीचे रूप घेतले. या रूपात सप्तश्रृंगीने महिषासुराचा वध केला. दुष्टशक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे जगदंबेला वणीकर सप्तश्रृंगीचे मूळ रूप मानतात. यामुळे गडावर केलेला एखादा नवस वणीच्या जगदंबेकडे फेडला जाऊ शकतो. मात्र, जगदंबेकडे केलेला नवस सप्तश्रृंगीकडे फेडला जाऊ शकत नाही, असेही वणीकर सांगतात.

  सप्तशृंगीचाच अवतार समजल्या जाणाऱ्या वणीच्या जगदंबा देवीची मूर्ती पार्वतीबाई पुणेकर यांनी स्थापन केली आहे. पेशवाईत व अहिल्याबाईंच्या काळात परिसरात सुंदर हेमाडपंती मंदिर व कुंडे बांधली व नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरातील पूर्वी असलेली मूर्ती कागदी लगद्यापासून बनविलेली असल्याने ती जीर्ण झाली. मग, थोरात समाजाच्या पंचांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने १९१३ मध्ये मूर्ती बसविली. ही मूर्ती झिजल्याने १९२८ मध्ये पुन्हा कागदी लगद्याची मूर्ती बसविली. परंतु, तीही जीर्ण झाल्याने १९५१ मध्ये तांब्याच्या धातूपासून बनविलेली तेजस्वी, आकर्षक व मनोहारी पूर्वाभिमुख देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जगदंबा देवीच्या मूर्तीखाली १० ते १२ फूट खोलीवर स्वयंभू चार चिरंजीव आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश व नारायण हे देवीचे चार पुत्र समजले जातात. या खोलीत त्यांच्या शीळा असून ही खोली हळदकुंकू, गुलाल व भंडाऱ्याच्या जाड थराने भरण्यात आली आहे. त्यावर देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. माहूरच्या रेणुका देवीप्रमाणे जगदंबेची फक्त शीराची मूर्ती येथे आहे. असे म्हटले जाते की देवीच्या तीर्थकुंडात ब्रह्मा, विष्णू, महेश व ऋषीसंतांनी तर्पणविधी केला होता. त्यामुळे या परिसराला आगळेवेगळे महत्त्व आहे. देवीच्या मूर्तीची उंची सहा फूट असून, डोक्यावर चांदीचा मुकूट, कानात चांदीची कर्णफुले, नाकात मोती जडलेल्या सोन्याची नथ, गळ्यात मंगळसूत्र असा साजशृंगार असून, देवीला पूर्ण नऊवार पातळ लागते. देवीची पूजेसाठी व चैत्र पोर्णिमेपासून ते अमावस्थेपर्यंत होणाऱ्या यात्रेदरम्यान राज्यभरातून तसेच गुजरातहून लोक पायी येतात. अनेक संत महात्मे व साईबाबांचा सहवासही जगदंबा मंदिराला लाभला आहे. पूर्वी या मंदिरात थोरात व देशमुखांकडे रेडा बळी देण्याची प्रथा होती. ब्रिटिश राजवटीत संत गाडगेबाबांच्या पुढाकारानंतर ही प्रथा बंद झाली, अशी माहिती पुजारी सुधीर दवणे यांनी दिली.

  पेशवेकालीन तलाव
  देवीच्या मंदिरासमोर तीन तीर्थांचे पेशवेकालीन तलाव अथवा कुंड आहेत. यात ऋषींनी तर्पण विधी केला आहे. पैकी दोन कुंडांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, याची अधिक देखभाल होणे गरजेचे आहे. येथे भाविकांच्या स्नानाची सोय होते. काही वर्षांपूर्वी वेदशास्त्री शंकराचार्य यांनी नवचंडी महायाग केला. त्यांच्या तपश्चर्येमुळे दूधगंगा वाहिली, अशी आख्यायिका वणीकर सांगतात. दानशूर बडोदेकर, अहिल्यादेवी होळकर, कै. गोधडे, गौतमीबाई गुजराथी यांनी मंदिरास धर्मशाळेसाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. जगदंबा देवी मंदिर परिसरात गणपतीचे मंदिर असून, हातात माळ जपणारी मनोहारी गजाननाची ही मूर्ती दुर्मीळ आहे. समोरील भागात दीपमाळ असून, शेजारील भागात शिवमंदिर, तुळशीवृंदावन, मागील भागात रामानंद स्वामींचा मठ आहे. हा मठ पाहण्यासाठी नेहमी भाविकांची वर्दळ असते. धर्मशाळा जुनी झाल्याने तिचा वापर बंद करण्यात आला आहे. नव्याने बांधलेल्या धर्मशाळेच्या माध्यमातून निवासाची सोय मंदिराच्या विश्वस्तांनी केली आहे.

  ताम्रपट
  वणीत एक ताम्रपट असल्याचे म्हटले जाते, मात्र तो कोणाकडे आहे? त्याचे वाचन झाले आहे की नाही याबाबत काहीच माहिती मिळत नाही. मात्र वणी येथे मिळालेला एक ताम्रपट सध्या मुंबई येथील बॉम्बे ब्रँच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटीकडे आहे. हा ताम्रपट राष्ट्रकूटकाळातील राजा गोविंद (तृतीय : इ.स. ७९४ ते इ.स. ८१४ ) याचा आहे. राष्ट्रकुटातील पराक्रमी राजा म्हणून तृतीय गोविंदने नाव कमावले होते. अनेक राजांना त्याने पराजित केल्याचे उल्लेख इतिहासात मिळतात. गोविंद राजाच्या या ताम्रपटाची लिपी नागरी असून, भाषा संस्कृत आहे. ताम्रपटावर चंद्रग्रहण, वैशाख पौणिमा, व्यय संवत्सर, शके ७३० (गतवर्ष) असे वर्ष व तिथी कोरली आहे. हा ताम्रपट राष्ट्रकूट नृपती (राजा) गोविंद (तृतीय) याच्या अमदानीतील आहे. या ताम्रपटाचा मुख्य उद्देश राजाने मयूरखंडी या राजधानीहून वेंगीनिवासी, भारद्वाज गोत्री द्विवेदी दामोदर याचा पुत्र चतुर्वेदी दामोरभट्ट याला नाशिक देशातील वटनगर विषयातील अंबकग्राम दान दिले हे नमूद करण्यासाठी हा ताम्रपट कोरला आहे. हा लेख वत्सराजपुत्र अरूणादित्य याने लिहिला व याप्रसंगी भुविराम हा दूतक होता असाही उल्लेख त्यावर आहे. वणीत मिळालेल्या ताम्रपटावर राष्ट्रकूटातील कृष्णराज, कृष्णराजचा पुत्र धोर (ध्रुव), ध्रुवाचा पुत्र गोविंदराज या राजांचा उल्लेख आला आहे. गोविंदराजाने आपले आजोबा व वडिलांना स्मरून धार्मिक कार्यासाठी दान दिल्याचे दिसते. या ताम्रपटात काही गावांची नावेही आली आहेत. यात वटनगर म्हणजे वणी असावे. तर लोन हे गाव भिवंडीच्या पूर्वेस सहा मैलांवरील लोनद असावे, तगरपूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर असावे, तर कटशडी व पढालसक या गावांची ओळख वाथेन व फ्लीट या संशोधकांना पटलेली नाही. मयूरखंडी म्हणजे वणीतील मार्केंडेय पर्वत असावा असेही म्हटले जाते. यावरून गोविंद राजाची ही राजधानी होती ती त्याने नंतर येथून हलविली. या ताम्रपटाने नव्याने वाचन व त्याचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न झाल्यास वणीच्या इतिहासाचे वेगळे पैलू समोर येऊ शकतात. बंद पडलेल्या बोहाड्यासारख्या लोकसंस्कृतीच्या जतनासाठीही वणीत प्रयत्न होण्याची गरज आहे.