
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील मंदिरं सरकारने भाविकांसाठी बंद केले होते. गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपाय योजले जात असताना, महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने सुदधा भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली होती. परंतू या कालावधीत राज्यात आपणच हिंदुत्त्वाचे कैवारी आहोत, या अविर्भावात राज्यातील भाजप नेत्यांनी मंदिर उघडण्यासाठी आकाश पाताळ ऐक केले. आणि सत्ताधाऱ्यांना अधिक कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला. आणि महाविकास आघाडी सरकार कसे हिंदूविरोधी आहे, हे दाखवण्याचा दररोज प्रयत्न केला. आता जरी आपण ‘सीमोल्लघंन’ करत असलो तरी, मागील दिड दोन वर्षात धार्मिक स्थळं आणि मंदिर याबाबत कोणकोणत्या घडामोंडी घडल्या? मंदिरांचे कसे राजकारण नेत्यांनी केले
देव, धर्म, मंदिरं आणि धार्मिक स्थळं हि आपल्या भारतीयांचा जिव्हाळाचा विषय. देशात कोरोना महामारीने थैमान घातल्यानंतर २३ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत देशातील अनेक राज्यातील विविध धर्मियांची धार्मिक स्थळं, मंदिरं कुलुपबंद ठेवण्यात आली होती. पण आता आपण हळूहळू ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळं राज्य सरकारने विविध क्षेत्रांना खुले करण्याची परवानगी दिली आहे. मागील दिड दोन वर्षापासून बंद असणारी मंदिरं नवरात्रोत्सवाच्या शूभ मुहूर्तावर भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा हळूहळू सकारात्मक बदल होत आहे, आणि आरोग्याची काळजी घेत आपण ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. कोरोनाच्या हाहाकारामुळं मागील दिड दोन वर्षात अनेकांचे जीवनमान कोलमाडले, कित्येकांचे होत्याचे नव्हते झाले. गर्दीमुंळ कोरोनाचा प्रादुर्भाव फैलावतो, म्हणून सार्वजनिक ठिकाणं, तसेच गर्दीच्या ठिकाणी सर्वसामान्यांना जाण्यास सरकारने मज्जाव केला होता, राज्य सरकारने भावनेपेक्षा जनतेच्या आरोग्याला महत्त्व देत काही कठोर निर्णय घेतले होते.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची अधिक परिस्थिती घातक होत होती. आणि देशात करोना बाधितांची संख्या वाढत चालली होती. महाराष्ट्रात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. देशातील तिसरा आणि महाराष्ट्रात करोनाचा पहिला बळी गेला होता. तर हजारो रुग्ण देखरेखीखाली होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील मंदिरं सरकारने भाविकांसाठी बंद केले होते. गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपाय योजले जात असताना, महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने सुदधा भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली होती. परंतू या कालावधीत राज्यात आपणच हिंदुत्त्वाचे कैवारी आहोत, या अविर्भावात राज्यातील भाजप नेत्यांनी मंदिर उघडण्यासाठी आकाश पाताळ ऐक केले. आणि सत्ताधाऱ्यांना अधिक कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला. आणि महाविकास आघाडी सरकार कसे हिंदूविरोधी आहे, हे दाखवण्याचा दररोज प्रयत्न केला. आता जरी आपण ‘सीमोल्लघंन’ करत असलो तरी, मागील दिड दोन वर्षात धार्मिक स्थळं आणि मंदिर याबाबत कोणकोणत्या घडामोंडी घडल्या? मंदिरांचे कसे राजकारण नेत्यांनी केले याचा आपण धांडोळा घेणार आहोत.
कोरोनापूर्वी मंदिरांची स्थिती
कोरोना विषाणूमुळं २३ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत देवळातील देवांना कुलुपबंद करुन ठेवण्यात आले होते, परंतु आता आपण हळहळू सकारात्मक पाऊल टाकत, आणि आरोग्याची खबरदारी बाळगत ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. कोरोनापूर्वी देशातील मंदिरांची परिस्थिती आणि देवदर्शन अगदी सुरळीत चालू होते. जी देवस्थानं सरकारच्या अखत्यारित येतात ती, आणि खासगी देवस्थानं अशा दोन्ही देवस्थांच्या तिजोरीत दररोज लाखो, करोडो रुपये जमा होत होते. देशातील जी देवस्थानं, मंदिरं प्रसिद्ध आहेत तिथे दर्शानासाठी सुद्धा पैसे मोजावे लागत होते.
देशातील सुप्रसिद्ध आणि नामांकित मंदिरं म्हणजे तिरुपती बालाजी, केरळातील अनेक मंदिरं, शिर्डीचे साई मंदिर, अमृतसर येथील सुवर्णमंदिर, वैष्णो देवीचे मंदिर, अमरनाथ यात्रा, पंढरपुरातील विठ्लाचे मंदिर अशी विविध मंदिरांवर आणि धार्मिक स्थळांमध्ये दररोज लाखो रुपये जमा होत होते, त्यातील काही मंदिर ट्रस्टी किंवा देवस्थानं हि या पैश्यातून सामाजिक उपक्रम राबवत होते, आता सुद्धा राबवत आहेत. परंतू मंदिरावर अनेकांचे पोट चालते, कित्येकांना रोजगार मिळतो, अगदी फुल, हारवाले, नारळवाले, पेढेवाले, प्रसाद, पुजारी, पंडित आणि मंदिराशी संलग्न असाणाऱ्या बाबी ह्या सर्व मंदिरावर अवलंबून होत्या किंबहुना आजही आहेत. कोरोनापूर्वी देशात कधीतरी कोरोनाची लाट येईल आणि मंदिरांना टाळे लागतील असं कोणालाही वाटले नव्हते. परंतु जो विश्व चालवतो तो म्हणजे देव, त्या देवाला सुद्धा कोरोनामुळं त्यावेळी भक्तांच्या मनात, ह्दयात नाही तर, कुलुपबंद मंदिराच्या चार भींतीच्या आत राहवे लागले होते.
कोरोनाकाळातील मंदिरं
जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना महामारीमुळं आरोग्य व्यवस्था, सरकारी यंत्रणा, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडं दुर्लक्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी कोरोनाने खूप काही शिकवले आहे. कोरोनाच्या काळात कोट्यवधी लोकांचे जीव गेले, त्यामुळं हे रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादले गेले. विविध क्षेत्रांना टाळे लावण्यात आले होते. या सगळ्यात माणसांचा जीव महत्वाचा, कारण माणूस आहे म्हणून देव आहे, मंदिर काही काळं बंद राहिली तरी चालेल पण माणूस जगला पाहिजे, अशी राज्य सरकारची भूमिका होती. याला खुद्द वैज्ञानिकांचा, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनांचा आधार होता. त्यामुळं समस्त मानवाच्या भल्यासाठी जर सरकारनं मंदिरं बंदचा निर्णय घेतला तर, त्याला देवच काय देवाच्या नावानं राजकारण करणारी मंडळीही काहीही करु शकत नव्हती. कारण त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत होता, अशावेळी गर्दीची ठिकाणं आणि मंदिरं बंद करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.
दरम्यान त्यावेळी महाराष्ट्रात सर्वच धर्माची प्रार्थनास्थळं बंद होती. आपल्याकडं अशी धार्मिक स्थळं ही कमी अधिक प्रमाणात लोकांच्या पोटापाण्याशी जोडली गेलेली आहेत. यामध्ये हिंदूंचा वरचष्मा आहे. खुद्द धर्मगुरुंनी हे मान्य केलं आहे. “कोरोनाच्या काळात मंदिर बंद राहिल्यानं देणग्या बंद झाल्या, उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्यानं आमची उपासमार होत आहे,” हे कधी नव्हे ते या पुजाऱ्यांनी खुलेपणानं सांगितलं. मंदिरं बंद राहिल्यानं केवळ या वर्गाचीच नव्हे तर मंदिरांबाहेर पानं-फुलं, हारतुरे, प्रसादिक, देवदेवतांच्या प्रतिमा आणि धार्मिक साहित्य विकणाऱ्या छोट्या-सामान्य माणसांचाही त्यामुळं जगण्याचा आधार बंद झाला. तीर्थक्षेत्रांची ही एक अर्थव्यवस्था, ती साधीसुधी नक्कीच नाही. करोडो रुपयांच्या उलाढाली चालतात इथं. पण केव्हा? जेव्हा लोक देवाकडे आपली गाऱ्हाणी घेऊन प्रत्यक्ष मंदिरांमध्ये किंवा या तीर्थक्षेत्रांवर येतील तेव्हाच. म्हणजेच या व्यवस्था कोरोनामुळं बंद पडल्या. त्यामुळं त्याचा देवस्थानच्या उत्पन्नाबरोबरच या छोट्या विक्रेत्यांवरही थेट परिणाम होतोय. अशी ओरड त्यावेळी ऐकायला मिळाली होती. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढपूरच्या वारीला सुद्धा भक्तांना मुकावे लागले होते. त्यामुळं वारीची पंरपरा खंडित न करता, मोजक्या भक्तांसह वारी साजरी करण्यात आली. तसेच जगतगुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ इत्यादी संताच्या पालख्या गर्दी न करता मार्गस्थ करण्यात आल्या होत्या. कोरोनामुळं कित्येक वर्षाची, महाराष्ट्राची परंपरा असलेल्या वारीवर सुद्धा कोरोनाचे सावट राहिल्याने वारी साजरी करता आली नाही.
जेव्हा कोरोनाच्या काळात सर्व धार्मिकस्थळांना कुलुपं लावण्याचे आदेश निघाले तेव्हा वरील सर्व व्यवस्था गडबडली, भांबावली. पण माणूस जगणं महत्वाचं त्यामुळं हे निर्बंध येणं क्रमपाप्त होतेच. इथल्या व्यवस्थेत देव नव्हे तर माणूसच केंद्रस्थानी आहे. कारण ही व्यवस्था उभारणारा तोच, जगवणारा तोच, टिकवणाराही तोच. तज्ज्ञांनी सुद्धा स्पष्ट इशारा दिला होता की, कोरोनाला रोखायचे असेल तर निर्बंध हाच पर्याय. त्यामुळं सरकारने त्यावेळी मंदिर बंदचा निर्णय घेतल्याने अनेकांचे भावना दुखावल्याचे बोलले गेल. परंतू देव, भावना यापेक्षा माणसाचे जीवन केव्हाही अधिक महत्त्वाचे नाही आहे का? त्यावेळी नागरिकांना, भाविकांना आपल्या देवतांचं दर्शन घ्यायचंच असेल तर ते ऑनलाईनही उपलब्ध झालंय. या ऑनलाईन दर्शनाचा सर्वांना लाभ घेता येईल, असं आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी राज्याच्या जनतेला केलं होतं.
बंद मंदिराचे राजकारण
महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’च्या टप्प्यात अनेक गोष्टींना सशर्त परवानगी दिली गेली होती. मॉल्स उघडले, राहण्यासाठी हॉटेल्स उघडली, रस्त्याच्या दुतर्फा दुकानं सुरु झाली. पण रेस्टॉरंट्स, जिम्स आणि धार्मिक स्थळांना परवानगी दिली गेली नव्हती. त्यामुळं त्यावेळी त्या क्षेत्रांमधील संघटना, आणि खासकरुन मंदिरं उघडण्यासाठी राज्यातील भाजप नेते आक्रमक झाल्याचे आपण पाहिले. सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. जर धार्मिक स्थळं उघडली तर मग उद्भवणाऱ्या समस्या कोण सोडवणार? मंदिरं उघडायला परवानगी दिली तर मग मशिदी, चर्च, गुरुद्वारे या सगळ्यालाच परवानगी द्यावी लागेल. मग तिथे होणारी गर्दी कोण नियंत्रित करणार? जर झुंबड उडाली तर मग त्यावर नियंत्रण कोण मिळवणार? फिजिकल डिस्टन्सिंग कसं पाळलं जाणार आणि सॅनिटायझेशनचं काय? आदीबाबत राज्य सरकार गंभीर होते, त्यामुळं मंदिर उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली नव्हती.
कोरोनाच्या काळात धार्मिक स्थळं उघडणं हा फक्त भावनेचा मुद्दा नाही तर तो राजकीय मुद्दाही बनलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना धार्मिक स्थळ उघडण्याची मागणी केली होती. पण धार्मिक स्थळं उघडताना काळजी घ्यावी लागेल, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होते. “धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं कठीण आहे. जर काटेकोरपणे पालन केलं तर धार्मिक स्थळं सुरू करायला कोणीही विरोध करणार नाही. पण ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामुळे थोडी सबुरी बाळगू, वेळ लागला तरी हरकत नाही,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.
तुम्ही हिंदूद्वेष्टे आहात, हिंदूंची श्रद्धास्थान उघडण्याबाबत चालढकल करत आहात, असे आरोप भाजप आणि मनसेनं केला होता. भाजपची आध्यात्मिक आघाडी यामध्ये आघाडीवर होती. त्यांनी मंदिर उघडण्यासाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली. विशेष म्हणजे ज्येष्ठ सामाजसेवक असलेले पण सध्याच्या घडीला समाजाची चिंता नसणाऱ्या अण्णा हजारेंचीही त्यात भर घातली. कुठल्याशा ‘मंदिर बचाव समिती’च्या सांगण्यावरुन त्यांनी थेट जेलभरो आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. मनसेनंही यात उडी घेतली आणि हिंदूंच्या सणांनाच तुम्हाला नियम आठवतात का? असा सवाल महाविकास आघाडी सरकारला त्यांनी केला.
“मदिरालय सुरु करता, मॉल आणि बार सुरु करता पण मंदिरं बंद ठेवता” असा युक्तीवाद भाजपकडून वारंवार केला जात होता. राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करताना ‘मंदिर हम खुलवाएंगे, धर्म को न्याय दिलवाएंगे’ अशी नारेबाजी भाजपाने केली होती. देशभरात सगळीकडे मंदिरं सुरु असताना महाराष्ट्रातच ती बंद का? असा सवाल विरोधकांनी सातत्याने केला होता. ज्या राज्यांमधील मंदिर खुली आहेत, त्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात दुसऱ्या लाटेत काय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तिथली सरकारं रुग्णांच्या आणि मृतदेहांच्या नोंदी लपवण्यात आघाडीवर होती. उत्तर प्रदेशमध्ये गंगेच्या पात्रामध्ये मृतदेह सोडून दिले जात होते. हिंदूंचे मृतदेह चक्क धर्माच्या परंपरांविरोधात जाऊन जमिनीत पुरले जात होते. अशा राज्यांचा आदर्श भाजपा महाराष्ट्राला सांगत आहे का? असा चिमटा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना काढला होता. दरम्यान याच काळात उलट सरकारी तिजोरीत पुरेसा पैसा नसल्यानं “कोरोना काळात मंदिरांतील संपत्ती ताब्यात घ्यावी” अशी मागणी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंदिरं न उघडण्यामागील कारण सांगताना केंद्राकडूनच आपल्याला सणांच्या काळात स्थानिक निर्बंध लावण्याच्या सूचना आल्याचं म्हटलं होतं. काहीजण म्हणतात की, तुम्ही हे उघडलं, ते उघडलं नाही. जबाबदारी तुमच्यावर नाही आमच्यावर आहे, त्यापेक्षाही जनतेवर आमचं प्रेम आहे. उगाच तंगड्यात तंगड घालण्यात अर्थ नाही. गोष्टी बंद ठेवण्याची आमची मानसिकता नाही, पण याला सध्या पर्यायही नाही” असं उद्धव ठाकरेंनी बंद मंदिरावर स्पष्टीकर दिले होते. “उघडलेल्या दरवाजातून सुबत्ता, समृद्धी आली पाहिजे, कोरोना नको, तरच त्या उघडलेल्या दरवाजाला अर्थ आहे” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी मंदिरं उघडण्यावरुन राज्यात बरेच राजकारण रंगले होते. आणि तापले होते.
दर्शनासाठी धार्मिक स्थळं खुली
तब्बल दिड दोन वर्षानंतर हळहळू सर्व क्षेत्र खुले होत आहेत. त्यामुळं आता कोरोनाच्या संकटावर आपण ‘सीमोल्लंघन’ करत, सर्व काही पूर्वपदावर आणत आहोत. विविध क्षेत्रात आता आपण ‘सीमोल्लंघन’ केलं आहे. त्यामुळं देव, धर्म आणि मंदिरं ह्या जिव्हाळाच्या, भावनेच्या विषयावर सुद्धा आपण ‘सीमोल्लंघन’ करत आहोत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याच्या पाशर्वभूमीवर राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांमध्ये, भक्तांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. आणि या निर्णयाचे भक्तांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर कोरोनाविघ्न संकट पुन्हा उद्भवू नये यासाठी विविध मंदिर प्रशासनेही राज्य सरकारद्वारा जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन होईल, यासाठी सज्ज झाली आहेत.
सरकारने राज्यातील धार्मिक स्थळांसाठी केलेल्या नियमावलीनुसार ६५ वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेले नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, निर्जंतुकीकरण इत्यादी आवश्यक करण्यात आले आहे. कोणत्या प्रार्थनास्थळामध्ये किती भाविकांना प्रवेश दिला जावा, याचा निर्णय संबंधित प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापन समिती वा ट्रस्टने घ्यावयाचा आहे. भाविकांच्या गर्दी आणि प्रमाणाचे नियोजन करण्यासाठी ठराविक अंतरावर मार्किंग्ज करून रांगा लावण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळं इथून पुढे देवस्थान, मंदिर ट्रस्टी यांना सरकारच्या नियमावलीचे पालन करत मंदिरं सुरु ठेवावी लागणार आहेत, देवस्थान, मंदिर ट्रस्टी यांना वेळोवेळी मंदिरातील निर्जंतुकीकरण करावे लागणार, प्रत्येक भाविकाला मंदिरात प्रवेश करताना मास्क अनिवार्य, रांगेत दर्शन घेताना भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवावे लागणार आहे. जर भविष्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर, पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असं सुद्धा सरकारने म्हटले आहे. तसेत मंदिर सुरु झाल्यामुळं पुन्हा एकदा अर्थचक्राला गती मिळेल, आणि मंदिरावर अवलंबून असणारी मंडळीना नक्कीच दिलासा मिळाला असेल. देव, धर्म, आणि मंदिर हा लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न असल्याने मंदिर सुरु झाल्यामुळं पुजाऱ्याबरोबर भक्तांमध्ये सुद्धा आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. मंदिर सुरु करण्याच्या निर्णयाचे लोकांनी स्वागत करत, अनेक ठिकाणी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. कोरोना विषाणूमुळं २३ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा झाली. तेव्हापासून आतापर्यंत देवळातील देवांना कुलुपबंद करुन ठेवण्यात आले होते, परंतु आता आपण हळहळू सकारात्मक पाऊल टाकत, आणि आरोग्याची खबरदारी बाळगत ‘सीमोल्लंघन’ करत आहोत.