आजपासून आंगणेवाडीची यात्रा, आपापल्या घरूनच नमस्कार करण्याचं गावकऱ्यांचं आवाहन

आंगणेवाडीत येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून केवळ आंगणे कुटुंबियांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी या मार्गावरून येणाजाणाऱ्यांची तपासणी करण्यात येत असून इतरांना माघारी पाठवले जात आहे. आंगणेवाडीत एका वेळी जास्तीत जास्त ५० जणांना मंदिरात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलीय. 

    राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडीची यात्रा आजपासून सुरू झाली आहे. आंगणेवाडीतील श्री देव भराडीमातेचा वार्षिकोत्सव आजापासून पार पडणार आहे. मात्र यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असून अनेक नियम आणि अटींसह ही यात्रा पार पडणार आहे.

    आंगणेवाडीत येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून केवळ आंगणे कुटुंबियांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी या मार्गावरून येणाजाणाऱ्यांची तपासणी करण्यात येत असून इतरांना माघारी पाठवले जात आहे. आंगणेवाडीत एका वेळी जास्तीत जास्त ५० जणांना मंदिरात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलीय.

    पहाटे चार वाजल्यापासून देवीचं दर्शन सुरू करण्यात आलंय. संपूर्ण मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आलीय. मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईनं उजळून गेलाय. या काळात सुरक्षेसाठी २१ पोलीस अधिकारी, १९१ पोलीस अंमलदार, १ बॉम्बनाशक पथक, १ आरसीपी नैतात असणार आहेत.

    कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला केवळ आंगणे कुटुंबीयच उपस्थित राहू शकतील, असा नियम करण्यात आलाय. भाविकांच्या गैरसोयीबद्दल आंगणे कुटुंबीयांनी दिलगिरी व्यक्त करत कोरोना संकटामुळे येत असलेल्या मर्यादा समजून घेण्याची विनंती केलीय.

    आपण ज्या ठिकाणी असाल, तिथूनच भराडी मातेला नमस्कार करावा आणि आपलं मागणंही घरातूनच मागावं, अशी विनंती आंगणे कुटुंबियांनी भाविकांना केलीय. आंगणे कुटुंबियांनादेखील गर्दी न करता, कोरोना संबंधित सर्व अटी आणि नियमांचं पालन करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्यात.