बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं; मुख्यमंत्री ठाकरेंचा राणेंवर प्रहार

मुख्यमंत्री म्हणाले की, पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं असा टोला त्यांनी लगावला. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत. पण कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका केली.

    सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते.

    दरम्यान यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आजचा क्षण हा आदळापट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कुणी काय केलं आणि कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोकणाची संपत्ती आपल्याला जगासमोर न्यायची आहे. कोकणचं कॅलिफोर्निया करु असं अनेकजण म्हणायचे. बाळासाहेब म्हणाले होते, कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा भारी बनवा. कोकणच्या विकासानं आजपासून भरारी घेतली आहे. या विमानतळामुळं अनेकांना लाभ होणार आहे, असं ते म्हणाले.

    उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका

    मुख्यमंत्री म्हणाले की, पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं असा टोला त्यांनी लगावला. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत. पण कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका केली. नारायणराव आपण लघु उद्योग खात्याचे मंत्री आहात पण केंद्रीय मंत्री आहात. विकासकाम आपण नक्की कराल, असं ते म्हणाले.

    नारायण राणे काय म्हणाले?

    आज आनंदाचा क्षण आहे. अशा क्षणी कुठलंही राजकारण नको. आपण जावं, शुभेच्छा द्याव्या या हेतूने मी इथं आलो आहे. विमानं पाहिलं आणि खूप बरं वाटलं. देश विदेशातून पर्यटक सिंधुदुर्गात यावे आणि व्यवसाय वाढून आर्थिक समृद्धी व्हावी असं वाटतं, असं नारायण राणे म्हणाले. माझा जन्म सिंधुदुर्गातील आहे. मात्र मी मुंबईत आलो. मला बाळासाहेबांनी पुन्हा इकडं पाठवलं. मी आलो आणि निवडूनही आलो. इथं खूप समस्या होत्या मात्र मी बाळासाहेबांच्या प्रेरणेनं इथं विकासकामं केली. साहेबांच्या आशिर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. मी कोकणात विकासाची अनेक कामं केली पण मला त्याचं श्रेय घ्यायचं नाही, ते श्रेय बाळासाहेबांचं आहे की ज्यांनी मला संधी दिली, मी निमित्तमात्र होतो, असंही ते म्हणाले.

    नारायण राणे आणि उद्धव ठाकरे शेजारी शेजारी बसले

    एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खुर्ची लावण्यात आली होती तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री पवार बसले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने उपस्थित होते.