
वातावरण बदलाचा परिणाम कृषी क्षेत्रावर होत असल्याची चर्चा होते; मात्र सागरी जिवांवर याचा खूप मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. समुद्रात तापमानानुसार वेगवेगळे करंट असतात. कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात मिळणारे जेलीफिश, ट्रीगर फिश आणि पेडव्या, बांगड्यासारख्या माशांचा मुंबईपर्यंत झालेला प्रवास याचेच संकेत देत आहेत.
सिंधुदुर्ग : माशांच्या अधिवासावर वातावरण बदलाचा थेट परिणाम दिसू लागला आहे. यामुळे भविष्यात महाराष्ट्रात मिळणारे काही मासे गायब होऊन वेगळेच मासे मिळू लागल्यास आश्चर्य वाटणार नाही. परंतु याचा थेट थेट परिणाम मत्स्योत्पादनावर होण्याची भीती आहे.
वातावरण बदलाचा परिणाम कृषी क्षेत्रावर होत असल्याची चर्चा होते; मात्र सागरी जिवांवर याचा खूप मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. समुद्रात तापमानानुसार वेगवेगळे करंट (प्रवाह) असतात. कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात मिळणारे जेलीफिश, ट्रीगर फिश आणि पेडव्या, बांगड्यासारख्या माशांचा मुंबईपर्यंत झालेला प्रवास याचेच संकेत देत आहेत.
माशांना प्रामुख्याने १८ ते २६ अंश सेल्सियस इतके तापमान हवे असते. सस्तन प्राण्यांप्रमाणे शीत रक्ताच्या असलेल्या माशांमध्ये बदलत्या तापमानानुसार स्वतःच्या शरीरात बदल करण्याची सोय नसते. शरीराला आवश्यक इतक्या तापमानाच्या पाण्यात ते आपल्या अधिवासाच्या ठिकाणी निवडतात. या पारंपरिक अधिवासात तापमान बदलले, तर ते जागा बदलतात. नैसर्गिक खाद्याची उपलब्धता हाही यातील महत्त्वाचा घटक असतो.