मंत्र्यांसमोर बसत असताना सर्व माहिती आणि अभ्यास करत जा; पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवारांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे कोकणातील झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात बैठक घेतली. कृषी विभागाचे पंचनामे धिम्या गतीने सुरू असल्यामुळे वडेट्टीवारांना संताप अनावर झाला. त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने व लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले.

    सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे कोकणातील झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात बैठक घेतली. कृषी विभागाचे पंचनामे धिम्या गतीने सुरू असल्यामुळे वडेट्टीवारांना संताप अनावर झाला. त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने व लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले.

    या बैठकीत खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक उपस्थितीत होते. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागातील शेतीचे पंचनामे लवकर करावेत. त्यासाठी इतर ठिकाणाहून मनुष्यबळ मागवावे. संरक्षण बंधारे बांधले नाहीत तर भविष्यात गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी संबंधित विभागाने सविस्तर अहवाल सादर करावा, असे म्हणत वडेट्टीवारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

    काय तुमचा अभ्यास. अजून तुम्ही झोपले होते का? मंत्र्यांसमोर बसत असताना सर्व माहिती आणि अभ्यास करत जा. कृषी विभागाने बागायदार आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसू नयेत. युद्ध पातळीवर काम करा असे  विजय वडेट्टीवार म्हणाले.

    कृषी विभागाकडून झालेल्या 30 टक्के पंचनामे आणि कामात होणारी दिरंगाई याच मुद्यावर विजय वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर आक्रमक झाले. वादळामुळे नुकसान मोठे झाले आहे. पंचनाम्यांचे आदेश दिले असून घरांचे पंचनामे जवळपास संपत आले आहे. शेतीचे आणि फळबागांचे पंचनामेही सुरु आहेत. ते ही लवकरच पूर्ण होतील. कोकणवासियांना भरीव मदत केली जाईल. कोणालाही नाराज न करता सढळ हाताने कशी मदत केली जाईल ही भूमिका शासनाची आहे. संरक्षण बंधारे बांधण्यासाठी तातडीने मंत्रालयात बैठक बोलावली जाईल त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासनही वडेट्टीवारांनी दिले.