चिपी विमानतळाचे आज उद्घाटन, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार, दोघांच्याही भाषणाबाबत उत्सुकता

चिपी विमानतळाचे आज शनिवारी 09 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. दरम्यान या उद्घाटनाव्यतिरिक्त या कार्यक्रमादरम्यान काय राजकीय फटकेबाजी होणार याकडे कोकणवासीयांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर आज उपस्थित राहणार आहेत.

  सिंधुदुर्ग : महत्त्वाचा प्रकल्प असणाऱ्या चिपी विमानतळाचे आज शनिवारी 09 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. दरम्यान या उद्घाटनाव्यतिरिक्त या कार्यक्रमादरम्यान काय राजकीय फटकेबाजी होणार याकडे कोकणवासीयांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर आज उपस्थित राहणार आहेत.

  दरम्यान शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे दोघे दोन वेगवेगळ्या विमानांनी प्रवास करणार आहेत. अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी टेकऑफ घेणाऱ्या विमानात केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, अनेक आमदार,आय. आर.बी आणि एमआयडीसीचे अधिकारी आणि प्रवासी प्रवास करतील. तर दुसऱ्या खाजगी विमानातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रवास करतील.

  ज्योतिरादित्य शिंदे प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण दिले होते. मात्र चिपी विमानतळ उद्घाटनाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत. ते या कार्यक्रमात व्हर्च्युअली सहभागी होतील. नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते उद्घाटन सोहळ्यास जाणार नसल्याची माहिती मिळते आहे.

  तर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे.

  कोणकोणते नेते उपस्थित राहणार?

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, अॅड.अनिल परब, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा नेते निलेश राणे, आमदार नितेश राणे, अदिती तटकरे, निरंजन डावखरे, आमदार दिपक केसरकर, वैभव नाईक राहणार उपस्थित राहणार आहेत. आज याठिकाणी 72 प्रवाशांचे विमान 12.45 लँड होणार आहे.