‘ते’ असताना नाही संपवू शकले, तर ते नसताना काय संपवणार? राणेंची # दादागिरी…

'ते' असताना नाही संपवू शकले, तर ते नसताना काय संपवणार? # दादागिरी.., अशा आशयाचा फलक सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. देवगडच्या मांजरेकर नाक्यावर हा पोस्टर लावण्यात आला आहे आणि सध्या हा फलक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

  सिंधुदुर्ग : मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरूद्ध शिवसेना यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला तळकोकणात सुरूवात झाली आहे. परंतु राणे समर्थकांनी पोस्टरबाजी केली असून राणेंची #दादागिरी अशा प्रकारचं पोस्टर यात्रेदरम्यान लावण्यात आलं आहे.

  नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अशोभनीय वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. राणे विरूद्ध सेना असा वाद संपूर्ण राज्यभर पाहायला मिळाला. यामध्ये राणेंना अटक होऊन त्यांची सुटका देखील झाली. तसेच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा केल्यानंतर त्याचे पडसाद मुंबई ते कोकणापर्यंत उमटले. परंतु आज राणेंची जन आशीर्वाद यात्रा देवगडमध्ये आहे. मात्र, भाजपच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  काय लिहिलयं बॅनरमध्ये ?

  ‘ते’ असताना नाही संपवू शकले, तर ते नसताना काय संपवणार? # दादागिरी.., अशा आशयाचा फलक सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. देवगडच्या मांजरेकर नाक्यावर हा पोस्टर लावण्यात आला आहे आणि सध्या हा फलक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. परंतु या फलकावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत, त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडले. मनस्वस्थ बिघडलं आहे. त्यांच्या मुलाने त्यांना त्रास देऊ नये, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी नाशिकमधून दिला आहे.