पोपटराव पवारांंचा सरपंचांना सूचक सल्ला; ‘असं केलं’ तर अवघ्या १५ दिवसात गावं होतील कोरोनामुक्‍त…

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्‍त करण्याच्या अनुषंगाने आमदार नीतेश राणे यांनी पोपटराव पवार यांच्याशी जिल्ह्यातील सर्व सरपंचांचा ऑनलाईन संवाद घडवून आणला. यात पवार यांनी कोरोनामुक्‍त गावासाठी पाच पथकांची पंचसूत्री सांगितली.

  कणकवली : आपला गाव कोरोना मुक्‍त करण्यासाठी पाच पथकांनी समन्वयाने काम केलं तर अवघ्या १५ दिवसांत प्रत्‍येक गाव कोरोनामुक्‍त होईल. सिंधुदुर्ग जिल्हा देखील कोरोनामुक्‍त होण्यास वेळ लागणार नाही, अशी ग्‍वाही हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिली.

  दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्‍त करण्याच्या अनुषंगाने आमदार नीतेश राणे यांनी पोपटराव पवार यांच्याशी जिल्ह्यातील सर्व सरपंचांचा ऑनलाईन संवाद घडवून आणला. यात पवार यांनी कोरोनामुक्‍त गावासाठी पाच पथकांची पंचसूत्री सांगितली. ते म्‍हणाले, की कुटुंब सर्वेक्षण पथक, वाहन चालक पथक, विलगीकरणकक्ष पथक, डॉक्‍टर हेल्‍पलाईन पथक आणि लसीकरण पथकाच्या कामगिरीवर आमचा गाव कोरोनामुक्‍त करून दाखवला.

   काय म्हणाले पोपटराव पवार ?

  • गावात सर्वप्रथम सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण
  • सर्दी, ताप, खोकला असणाऱ्यांची रॅपिड टेस्ट
  • निगेटिव्ह आले त्‍यांची आरटीपीसीआर
  • वाहन चालक पथकाने सर्वांना शहरापर्यंत नेले.
  • उपचाराची जबाबदारी डॉक्‍टर हेल्‍पलाईनकडे
  • बाधितांची विलगीकरण कक्षात रवानगी
  • डॉक्‍टरांसह विलगीकरण कक्ष पथकाची चोख कामगिरी
  • नातेवाईकांना विलगीकरण कक्षात येण्यास मज्जाव
  • परिणामी गावात कोरोना संसर्ग टळला
  • लसीकरण पथकानेही पार पाडली महत्त्‍वाची जबाबदारी
  • सर्वप्रथम ज्‍येष्ट, फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण

  १५ दिवसांत हिवरेबाजार कोरोनामुक्‍त

  कोरोना मुक्‍त गावासाठी झटणाऱ्या या पाच पथकांना शिक्षक, पालक, विद्यार्थी संघानेही सर्वतोपरी मदत केली. त्‍यामुळे अवघ्या १५ दिवसांत हिवरेबाजार कोरोनामुक्‍त झाला. त्‍याच धर्तीवर सिंधुदुर्गातील प्रत्‍येक गाव कोरोना मुक्‍त होऊ शकतो, असे पवार म्‍हणाले.

  दरम्‍यान सर्व सरपंचांना विमाकवच मिळावे, १८ वर्षांवरील सरपंचांचे प्राधान्याने लसीकरण व्हावे आदी मागण्या आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्‍याचेही त्यांनी सांगितले. सरपंचांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांनाही त्यांनी उत्तरे दिली.