शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि फडणवीस यांच्यात गुप्त भेट; निलेश राणेंच्या दाव्यामुळे राजकीय खळबळ

भाजप नेते राज्याचे विरोधी पक्षनेते रत्नागिरी दौऱ्यावर असताना उदय सामंत त्यांना येऊन गुपचुप भेटतात. बंद दाराआड चर्चा होते. उदय सामंत यांचे सगळे विषय टेंडरचे असतात असा घणाघाती आरोप निलेश यांनी केला.

    सिंधुदुर्ग : शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    या भेटीचे त्यांनी थेट कारण सांगितले नसले तरी सिंधुदुर्ग वादळाच्या सावटाखाली असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गला वाऱ्यावर सोडले. भाजप नेते राज्याचे विरोधी पक्षनेते रत्नागिरी दौऱ्यावर असताना उदय सामंत त्यांना येऊन गुपचुप भेटतात. बंद दाराआड चर्चा होते. उदय सामंत यांचे सगळे विषय टेंडरचे असतात असा घणाघाती आरोप निलेश यांनी केला. फडणवीस आणि सामंत यांच्या या भेटीचा विषय आगामी काळात राजकीय वादळ उठविण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणे यांच्या या आरोपाला सामंत काय उत्तर देणार, याची उत्सुकता आहे. ही भेट फडणवीस यांच्या करेक्ट कार्य़क्रमाविषयी होती का, अशीही चर्चा होणे स्वाभाविक आहे.

    निलेश राणे काय म्हणाले ?

    दरम्यान, निलेश राणे यांनी आणखी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल लिहिले आहे. ‘देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूम पर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी.

    फडणवीसांचा कोकण दौरा

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच तीन दिवसांचा कोकण दौरा केला. देवगडमध्ये बंदरावर येऊन त्यांनी मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला होता. “मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत? आम्हीही असाच सवाल करायचा का?” असा सवाल करतानाच “गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत” अशी टीका फडणवीस यांनी केली होती.