देशातील नंबर एक मुख्यमंत्री म्हणून सुभाष देसाईंनी केला उद्धव ठाकरेंचा उल्लेख; तर नारायण राणेंचं नाव टाळलं

सुभाष देसाईंनी नारायण राणेंचं नाव घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी या विमानतळाच्या उद्घाटनाला उशीर झाल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, पायगुण लागतो म्हणतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन होत आहे, असंही देसाई म्हणाले.

  सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलं.

  दरम्यान यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित झाले होते. यावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला.

  सुभाष देसाई नेमकं काय म्हणाले?

  सुभाष देसाईंनी नारायण राणेंचं नाव घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी या विमानतळाच्या उद्घाटनाला उशीर झाल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, पायगुण लागतो म्हणतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन होत आहे, असंही देसाई म्हणाले.

  तसेचं खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विमानतळासाठी लागण्याचा प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा ते करत राहिल्याचं देसाईंनी सांगितलं. चिपी विमानतळाचा द्रोणागिरी उचलण्यासाठी अनेकांचा हातभार लाभला. त्यात मी ही एक बोट लावलं. कोकणाच्या, आपल्या दृष्टीनं हा आनंदाचा सण आपण साजरा करत आहोत. आता कोकणवासियांची सर्व स्वप्न साकार होतील, असंही देसाई यावेळी म्हणाले.

  आदित्य ठाकरेंनी केला राणेंचा उल्लेख

  सुभाष देसाई यांच्यानंतर बोलण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उभे राहिले. त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांचं नाव घेतलं. तसंच पर्यटनाच्या दृष्टीने कोकणाच्या विकासात हे चिपी विमानतळ एक मैलाचा दगड ठरेल असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.