कोकणातील चाकरमान्यांसाठी क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा करावा – खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्ग: कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या  चाकरमान्यांना कोणीही मज्जाव करणार नाही आणि आम्ही करू देणार नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले. तसेच भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने कोकणातील चाकरमान्यांसाठी क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा करावा, असेही राऊत यांनी म्हटले. 

राज्य सरकारने कोकणात येण्यापूर्वी चाकरमन्यांची कोरोना टेस्ट माफक दरात करावी. चाकरमान्यांना जिल्हा बंदी करण्याची कोणतेही आदेश प्रशासनाला देण्यात आलेले नाहीत. कोणीही या सगळ्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, असेही राऊत यांनी सांगितले. 

सिंधुदुर्गात शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना यावेळी त्यांनी म्हटले की, गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने आचारसंहिता तयार करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने भजन, आरती मोठ्याप्रमाणात होणे योग्य नाही.परंतु, यंदा भजन न करता घरी राहून आरत्या करा, अशी विनंती भजनी मंडळांना केल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.