सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहुतकीचा खोळंबा झाला आहे. तसेच देवगड तालुक्यातील वाडा येथे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कांदळगाव आणि मसुरे येथील परिसरात रस्त्यावर पाणी आल्याची माहिती समोर आली आहे.

मुसळधार पावसामुळे समुद्राला उधाण आले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून पावसाचा जोर प्रचंड असा वाढला आहे. भगवंत गड बांदिवडे रस्त्यावरच्या लहान पूल पाण्याखाली गेला. निरुखे पुलावरून पाणी जात आहे. दोडामार्गमध्ये तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेले काही दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आहे.

त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन तिलारी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. तिलारी धरणाचे अतिरिक्त पाणी तिलारी नदीपात्रात सोडले जात असून तिलारी प्रकल्पाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.