शिवसेनेला झोडणाऱ्या नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात मिळणार संधी ?…

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. ते, सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले. पावसाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. याबाबत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाली.

    सावंतवाडी : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. ते, सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले. पावसाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. याबाबत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाली.

    दरम्यान सर्व मंत्रालयांचा आढावा घेऊन खातेबदल, तसेच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय यात झाल्याचे समजते. नव्या विस्तारात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आता मंत्र्यांची संख्या ५४ आहे. ती ७९ पर्यंत जाऊ शकते. सध्या नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, रामदास आठवले हे महाराष्ट्रातील नेते केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. नव्या विस्तारातील आणखी काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे.

    तसेचं यात सध्या नंदूरबारच्या खासदार डॉ. हिना गावित, साताऱ्याचे खासदार उदयनराजे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, सांगलीचे संजय पाटील, विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासोबतच नारायण राणे यांचेही नाव चर्चेत आहे. राजकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार माजी मुख्यमंत्री असलेल्या राणे यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, असे संकेत होते; मात्र अद्याप याला मूर्तरूप आलेले नाही.

    या विस्तारात ही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा नेते म्हणूनही त्यांची राज्यात ओळख आहे. मोठ्या संख्येने असलेल्या या समाजाचा विचार करता त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात आता टोकाचा विरोध निर्माण झाला आहे. अशावेळी शिवसेनेशी थेट पंगा घेण्याचे काम राणे करत आले आहे. राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वैमनस्य जगजाहीर आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते; मात्र याला आणखीही एक किनार आहे. नुकतीच मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. शिवसेना आणि भाजप यांची अनेक वर्षांपासून युती होती.

    पश्‍चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर भाजपला भविष्यात अनेक पक्षांना एकत्र घेऊन सरकार स्थापनेचा पर्यायही लक्षात घ्यावा लागणार आहे. अशा स्थितीत राणेंना मंत्रिपद देऊन भाजप शिवसेनेला थेट राजकीय इशारा देणार का, हाही प्रश्‍न आहे. दरम्यान, राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. त्यांनी सकाळी सावंतवाडी तालुक्यातील आपला नियोजित कार्यक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते विमानाने गोवामार्गे मुंबईकडे रवाना झाले.