पंढरपूर तालुक्यातील रांझणीत पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ३३६० दारूच्या बाटल्या जप्त

    पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने अशा अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात अवैद्य देशी दारूचे ७० बॉक्स व त्यामध्ये असलेल्या १८० मिलीच्या एकूण ३ हजार ३६० बाॅटल असा २ लाख १६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

    उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाला गोपनीय माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या मौजे रांझणी येथील गावच्या हद्दीत अवताडे वस्तीजवळ येथे अवैध देशीदारू विकत असल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी पथकातील पोलीस उपनिरीक्षक हमीद शेख, पोलीस नाईक रोंगे,पोलीस कॉन्स्टेबल लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल हुलजंती यांनी छापा टाकला. त्यांना याठिकाणी प्रदीप बाळासाहेब आवताडे हा अवैधरित्या देशी दारू विक्री करीत असताना आढळला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या घराजवळ असलेला अवैध दारूसाठा दाखवला सदर चामाल हा नागेश प्रकाश ढोले यांचे वाहनातून आणल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

    या छाप्यामध्ये आरोपींकडून देशी दारू १८० मिलीच्या एकूण ३ हजार ३६० बाटल्या ७० बॉक्समध्ये असा २ लाख १६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई), ८३ प्रमाणे आरोपी प्रदीप बाळासाहेब आवताडे व नागेश प्रकाश ढोले दोघे राहणार रांझणी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास तालुका पोलिस करीत आहेत.