जिल्ह्यातील ११३२ शेतकऱ्यांना विहिरी मंजूर : संतोष धोत्रे

    सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी ११३५ शेतकऱ्यांची लॉटरी पध्दतीने नवीन विहिर लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी दिली.

    काेणत्या याेजनेतून किती रक्कम

    जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कृषी व पशू संवर्धन समितीचे सभापती अनिल मोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत अनुसूचीत जातीमधील एकूण १८ नवीन विहिर, विहिर दुरुस्ती कामे ९, वीज जोडणी आकार ३ कामे व विद्युत पंपसंच १५ अशा ४५ शेतकऱ्यांना रक्कम रुपये ५२ लाख ८० हजार रूपयांची मंजूरी देण्यात आली. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत अनुसूचीत जातीमधील एकूण ४ नवीन विहिर मागणी केलेल्या शेतकऱ्यांना रक्कम रुपये १० लाख रूपये मंजूरी देण्यात आली आहे. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत अनुसूचीत जमातीमधील एक विहिर दुरुस्ती कामांकरीता ५० लाभार्थ्यांसाठी ६३.३० लाख रूपये मंजूरी देण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीमार्फत ही मंजूरी देण्यात आली.

    ८६ शेतकऱ्यांना १ कोटी ३३ लाख

    जिल्हा निवड समितीमार्फत यापूर्वी या सर्व योजनाकरीता ३६ शेतकऱ्यांना ६९.७० लाख रक्कम रुपये मंजूरी देण्यात आली आहे. आज अखेर ८६ शेतकऱ्यांना १ कोटी ३३ लाख रूपये मंजूरी देण्यात आली आहे. लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या परंतू अद्याप कागदपत्रे अपलोड न केलेल्या ३४५ शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे शासन संकेतस्थळावर अपलोड करावीत. जेणेकरुन जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत त्यांना मंजूरी देणे सोईचे होईल, असेही धोत्रे यांनी सांगितले. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अन्य गरजू शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पध्दतीने अर्ज करावे, असे आवाहन कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.