डेंग्यू आणि मलेरियासाठी १५ बेड्स वार्ड तयार, योग्यवेळी योग्य उपचार : महापौर

    सोलापूर : कोरोना महामारीनंतर डेंग्यू आणि मलेरिया या साथीच्या रोगाने सोलापूर शहर आणि परिसरामध्ये थैमान घालत असल्याचे तज्ञाकडून सांगितले जात होते, याची दखल घेत पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निर्देशानुसार पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत डफरीन हॉस्पिटल येथे डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांसाठी 15 बेड्चे वार्ड तयार करण्यात आले.

    शनिवारी महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, आरोग्य अधिकारी अंजली हराळकर, डेंग्यू मलेरिया विभागाच्या पुजा नक्का यांच्या प्रमुख उपस्थितीत डेंगू मलेरिया वार्डाचे उद्घाटन करण्यात आले.

    डेंगू मलेरिया रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अद्यावत पंधरा बेडचे वार्ड तयार करण्यात आले असून, याशिवाय बालरोग तज्ञाची मदत या वार्डातील रूग्णासाठी होणार आहे. यामुळे रुग्णांस मोफत उपचार उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

    डेंगू-मलेरिया रुग्णांनी घाबरून न जाता योग्यवेळी योग्य उपचार घेण्याची संधी पालिकेच्या मार्फत डफरीन हॉस्पिटल येथे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.