ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेला ‘तो’ परत आलाच नाही…

    मोहोळ : शेतात पंप चालू करून ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१२) बोपले (ता. मोहोळ) येथे घडली. नवनाथ दिनकर ढेरे असे मृत तरुणाचे नाव आहे.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर बिरा ढेरे हे आपल्या कुटुंबासह शेती करून उदरनिर्वाह करतात. शनिवारी सकाळी नऊ वाजता वीज येते म्हणून दिनकर ढेरे यांचा मुलगा नवनाथ हा शेतातील पंप चालू करून उसाला पाणी देण्यासाठी जातो म्हणून घरातून बाहेर पडला. बराच कालावधी झाल्यानंतरही मुलाचा शेतात पोहोचलो असा फोन न आल्याने वडील दिनकर हे बघण्यासाठी शेतात गेले. शेतात सर्वत्र शोधाशोध करूनही मुलगा सापडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नदीवरून पाईपलाईन जोडलेल्या पॅनल बोर्डजवळ गेले असता, तो खाली पडलेला दिसला. त्यावेळी दिनकर ढेरे यांनी आरडाओरडा सुरू केला.

    लगतच्या शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नवनाथ ढेरे याला खासगी वाहनातून मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानुसार मृत मुलाचे वडील दिनकर ढेरे यांनी अज्ञात कारणावरून मुलाचा मृत्यू झाल्याची मोहोळ पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.