शहरातील रूग्णालयांनी जादा आकारलेले २ कोटी केले कमी; लेखापरीक्षकांचा कोरोना रूग्णांना दिलासा

  सोलापूर : कोरोना उपचारावर शासनाने ठरवून दिलेल्या बिलांच्या दरांपेक्षा अधिकचे दर लावून रूग्णांची लूट करणाऱ्या दवाखान्यांना लेखापरीक्षकांनी चाप लावला आहे. सोलापूर शहरात वर्षभरात खाजगी रूग्णालयांनी ७,८६० कोरोना रूग्णांना लावलेले जादाचे दोन कोटी दोन लाख ४९ हजार ९३३ रूपये लेखापरीक्षणांमुळे कमी झाले आहेत. यामध्ये शहरातील ४७ दवाखान्यांचा समावेश असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

  स्वतंत्र लेखापरीक्षक नियुक्त

  कोरोना काळात खाजगी रूग्णालये रूग्णांकडून जादा बिल वसूल करीत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहर आणि ग्रामीण भागात खाजगी रूग्णांलयासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक नियुक्त केले होते. सोलापूर शहरात २६ लेखापरीक्षक नेमण्यात आले होते. प्रत्येक लेखापरीक्षकांकडे दोन-तीन रूग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्याची जबाबदारी मनपा आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली होती.

  …तर ते बिल नातेवाईकांना भरावे लागते

  शहरातील ४७ रूग्णालयांनी ७८६० रूग्णांचे ५० कोटी ७२ लाख १४ हजार ३७६ रूपये बिल आकारले होते. यातील शासन निर्देशातील दरानुसार लेखापरीक्षकांनी तपासणी करून दोन कोटी दोन लाख ४९ हजार ९३३ रूपये जादा आकारले गेलेले पैसे कमी करण्यात आले आहेत. रूग्णांचा डिस्चार्ज होण्यापूर्वी रूग्णालयांनी केलेले बिल लेखापरीक्षकाकडे जाते. लेखीपरीक्षक बिलाची तपासणी करून जादा बिल आकारले असेल तर कमी करून देतात. शासनाच्या निर्देशानुसार बिल असेल तर ते रूग्णांच्या नातेवाईकांना भरावे लागते.

  प्रत्येक लेखापरीक्षकांना दोन-तीन दवाखान्यांची जबाबदारी

  प्रत्येक लेखापरीक्षकांना दोन-तीन दवाखान्याची जबाबादारी देण्यात आली आहे. मनपाच्या कोविड कंट्रोल रूमला तक्रार आली किंवा फोन आला तर रूग्णालयात जावून बिलाची तपासणी केली जाते. जून २०२० पासून बिलांची तपासणी करण्यात आली असून, रूग्णांना बिल कमी करून दिलासा दिला आहे. यामुळे बिलाबाबत रूग्णांच्या फसवणुकीचे प्रकार थांबले असल्याचे लेखाधिकाऱ्यांचे समन्वय अधिकारी विशाल पवार यांनी सांगितले.

  शहरातील रूग्ण आणि रकमेची आकडेवारी

  बिल कमी केलेले रूग्ण – ७८६०

  एकूण बिलाची रक्कम – ५० कोटी ७२ लाख १४ हजार ३७६ रूपये

  कमी केलेले बिल – २ कोटी २ लाख ४९ हजार ९३३ रूपये.