गाडीत बसण्याचा बहाणा करत ३ लाखांची रोकड लंपास

    मोहोळ : सोलापूरहून करमाळ्याला शेळ्या खरेदी करण्यासाठी पिकअप जीपमधून निघालेल्या व्यापाऱ्याला मोहोळ तालुक्यातील खंडाळी पाटीजवळ तीन महिलांनी लिफ्ट मागितली. गाडीत बसण्याचा बहाणा करत बोलण्यात गुंतवून गाडीच्या ड्राव्हरमध्ये कॅरीबॅगेत ठेवलेले ३ लाख २० हजार चोरून नेल्याची घटना ३ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच १३, ए.एक्स.९०१४ या पिकअप जीपमधून मुस्ताक मोहम्मद युसुफ धारूल (रा. गणेश पेठ सोलापूर) हे शेळ्या-मेंढ्यांची खरेदी करण्यासाठी सोलापूर होऊन करमाळ्याला दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान जात होते. त्यांचे सहकारी व्यापारी रियाज शफी दारुल व अब्दुल महाडिक दोघे सोलापूर यांच्याकडील व मुस्ताक यांच्याजवळील अशी एकूण ३ लाख २० हजार रुपयांची रोख रकमेसोबत घेऊन मुस्ताक दारुल मोहोळकडून शेटफळकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना खंडाळी गावच्या हद्दीतील संकेत हॉटेलजवळील काही अंतरावर शेटफळकडच्या बाजूस रस्त्याकडेला तीन महिला व त्यांच्यासोबत असलेल्या दोन लहान मुलांनी पिकअप गाडीला हात केल्याने चालक सुलतान रमजान तांबोळी याने त्यांच्याजवळ जाऊन वाहन थांबवले. त्यावेळी त्यातील एका महिलेने आम्हाला मोडनिंबला जायचे आहे.

    अत्यंत महत्त्वाचे काम असल्याचे सांगितले. त्यावेळी मुस्ताक धारुल यांनी दरवाजा उघडून त्यातील महिलांना बसण्यास सांगितले. तीनपैकी दोन महिला पिकअपच्या पुढच्या बाजूस बसल्या व एक महिला खाली थांबली होती. त्यांना पाठीमागे बसा, असे म्हणताच पुढे बसलेल्या दोन महिला व लहान मुले खाली उतरली.आम्हाला यायचे नाही, तुम्ही निघून जावा, असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवले.

    मुस्ताक व चालक तांबोळी अरण गावाजवळ गेल्यानंतर पिकअपच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले पैसे तपासले असता पैशांची कॅरीबॅग सापडली नाही. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले दोन महिलांनी कॅरीबॅगमधील ३ लाख २० हजार रुपये चोरून नेले आहेत. याप्रकरणी अज्ञात तीन महिलांविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात मुस्ताक मोहम्मद धारूल यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.