करमाळा तालुक्यासाठी ३० कोटींचा निधी; अनिरूध्द कांबळे यांची माहिती

  करमाळा : जिल्हा नियोजन मंडळाच्या वार्षिक योजना सन २०२०-२१ मधून करमाळा तालुक्यासाठी ३० कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध कांबळे यांनी दिली. जेऊर ता. करमाळा येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  यावेळी माजी आमदार नारायण पाटील, पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे, युवानेते अजित तळेकर, उपसभापती दत्ता सरडे, जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, बिभीषण आवटे, पंचायत समिती सदस्य पै. अतुल पाटील, शेखर गाडे, गणेश चौधरी, राजाभाऊ कदम, चौधरी सर, धुळाभाऊ कोकरे, देवानंद बागल, जिंतीचे सरपंच संग्रामराजे भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  कांबळे यांनी सांगितले की, जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ अंतर्गत करमाळा तालुक्यासाठी विविध योजनांमधून ९० गावांसाठी ३० कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्या अंतर्गत जनसुविधा १.५२ कोटी, नागरी सुविधा ६० लाख, तिर्थक्षेत्र विकास ३४ लाख ५० हजार, दलित वस्ती सुधारणा ५ कोटी, अतिवृष्टी रस्तेदुरुस्ती १.४५ कोटी, ३०५४ ग्रामीण मार्ग बळकटीकरण १.३०, कोटी, ५०५४ इजिमा रस्ते बळकटीकरण ६४ लाख, अंगणवाडी नवीन बांधकाम व दुरुस्ती ६९ लाख ५० हजार, नवीन शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्ती २.९० कोटी, लघुपाटबंधारे ३.४६ कोटी, पाणीपुरवठा योजनांसाठी ७.९१ कोटी, १५ वा वित्त आयोग ग्रामपंचायत बळकटीकरण ६०लाख, आरोग्य उपकेंद्र बांधकाम व दुरुस्ती २.६६ कोटी, पशुसंवर्धन अंतर्गत पशुवैद्यकिय दवाखान्यासाठी १.८० कोटी असा ३० कोटी ८८ लाख एवढा निधी करमाळा तालुक्यासाठी मंजुर केला आहे.

  माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली व अजित तळेकर यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा वार्षिक योजनेतून जास्तीत जास्त निधी खेचून आणला असून, त्यामुळे करमाळा तालुक्यातील ग्रामीण मार्ग, इतर जिल्हामार्ग यांची कामे मार्गी लागणार आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्तीदेखील करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जनसुविधा व नागरी सुविधा योजनांमधून गटार, स्मशानभूमी, काँक्रेट रस्ते,संरक्षक भिंत,हायमास्ट दिवे, पेविंग ब्लाॅक,ग्रामपंचायत कार्यालय इत्यादिंसाठी निधी उपलब्ध करुन दिला असून गावांचे सुशोभिकरण होण्यास मदत होणार आहे, पाणीपुरवठा योजनाअंतर्गत गावात पाईपलाईन,पाण्याच्या टाक्या यासाठी भरीव स्वरुपात निधी उपलब्ध केला आहे.

  लघू पाटबंधारे योजनेमधून ओढाखोलीकरण व बंधारे बांधण्यात येणार असून, जुन्या बंधाऱ्यांमधे दुरुस्ती करण्यात येणार आहे. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी गुळसडी, पाडळी,पांगरे येथे नवीन आरोग्य उपकेंद्र बाधण्यासाठी तर जुन्या आरोग्य उपकेंद्रांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शाळांचे नुकसान झाले होते, अशा ठिकाणी वर्गखोल्यांची दुरुस्ती तर आवश्यक ठिकाणी नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम यासाठी भरीव स्वरुपात तरतूद केली आहे.

  करमाळा तालुक्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केलेला असून, अजुनही सेस फंडातून व विविध योजनांतून करमाळा तालुक्याला झुकते माप दिले आहे. वैयक्तिक लाभाच्या विविध योजनाचा लाभ तालुक्यातील सबंधितानी घ्यावा, असे आवाहनही जि.प अध्यक्ष अनिरुध कांबळे यांनी केले आहे. प्रास्ताविक सुनिल तळेकर यांनी केले तर आभार प्रा. अर्जून सरक यांनी मानले.

  जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी करमाळा मतदारसंघातील गावांना भरीव निधी मंजूर करुन ग्रामविकास चळवळीला बळकटी दिली आहे. विद्यमान आमदार संजय शिंदे हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आमदारांनी केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेत असंत व आज ते आमदार म्हणून काम करत असताना जि प अध्यक्षांच्या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतच आहेत.

  दोन वर्षे झाली करमाळा मतदारसंघ हा विकासापासून वंचित असून विद्यमान आमदारांनी आता जि प अध्यक्षांकडून धडा घ्यावा, असा मार्मिक टोला माजी आमदार नारायण पाटील यांनी लगावला. तसेच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून सोलापूर जिल्हा परिषदेस पाणी पुरवठा योजनांसाठी भरीव निधी मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले.