जिल्ह्यातील २७ साखर कारखान्यांकडे तब्बल ३५० कोटी थकीत

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ऊस गाळप होऊन वर्ष लोटत आले तरी जिल्ह्यातील 27 साखर कारखान्याकडे जवळपास साडेतीनशे कोटी रूपयाची एफआरपीची रक्‍कम अद्याप शेतकर्‍यांना मिळाली नाही. त्यामुळे शासनाचा आदेश आणि शेतकरी संघटनाच्या इशार्‍यालाही साखर कारखानदार जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे.

    गेल्यावर्षी ऊस गाळप केलेल्या शेतकर्‍यांची एफआरपीची रक्‍कम मिळाली नसल्याने शासनाने आरआरसीची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषगांने जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई झाली. तरी ही जिल्ह्यातील 27 साखर कारखान्याकडे 350 कोटी रूपयाची एफआरपीची रक्‍कम थकविली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी साखर कारखानदार करीत नसल्याचे दिसत आहे. याबरोबर साखर आयुक्‍त कार्यालयाला शेतकरी संघटनानी एफआरपीची रक्‍कम उशीर देत असलेल्या साखर कारखानदारांकडून व्याजासह वसुल करण्याची मागणी केली होती. या मागणीलाही बगल देत साखर कारखानदार एफआरपी देण्यास उशीर लावत आहेत. या थकीत एफआरपीमुळे शेतकर्‍यांना बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही करता येईना आणि नव्याने कर्जही काढता येईना अशा दुहेरी संकटात ऊस उत्पादक शेतकरी अडकले आहेत.

    जिल्ह्यात थकीत एफआरपी असलेल्या साखर कारखान्यामध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखाना 20 कोटी 13 लाख, सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखाना 23 कोटी 6 लाख, संत दामाजी सहकारी साखर कारखाना 20 कोटी 42 लाख, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील 12 कोटी, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना 30 कोटी 30 लाख, विठ्ठलराव शिंदे 25 कोटी 66 लाख, श्री मकाई 15 कोटी 67 लाख, कुर्मदास 1 कोटी 86 लाख, लोकनेते बाबूराव पाटील 20 कोटी 95 लाख, सासवड माळी 5 कोटी 74 लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो 4 कोटी 9 लाख, लोकमंगल शुगर्स 24 कोटी 18 लाख, विठ्ठल कार्पोरेशन 7 कोटी 61 लाख, सिध्देश्‍वर शुगर 15 कोटी 36 लाख, इंद्रेश्‍वर 20 कोटी 82 लाख,युटोपियन 5 कोटी 87 लाख, गोकुळ 3 कोटी 24 लाख, मातोश्री लक्ष्मी शुगर 10 कोटी 49 लाख, शिवरत्न उद्योग 2 कोटी 37 लाख, बाबूराव शिंदे 10 कोटी 16 लाख, ओंकार शुगर चंद्रपूरी 48 कोटी 18 लाख, जयहिंद शुगर 11 कोटी 30 लाख, विठ्ठल रिफाईंड शुगर 5 कोटी 93 लाख, गोकुळ माऊली 1 कोटी 68 लाख, विठ्ठलराव शिंदे युनिट दोन 6 कोटी 78 लाख, भीमा टाकळी 28 कोटी 44 लाख, एसएसव्ही काळे चंद्रभांगा 19 कोटी 7 लाख असे एकूण 350 कोटी 64 लाख एफआरपीची रक्‍कम साखर कारखानदारांनी थकविली आहे.