चोरीच्या ४२ दुचाकींसह ४ गुन्हेगारांना अटक; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

  पंढरपूर : गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी सराईत गुन्हेगारांवर पाळत ठेवून सुमारे १५ लाख रुपये किमतीच्या चोरलेल्या ४२ मोटरसायकल आणि चार सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन अटक केली. मात्र, या गुन्हेगारांची नावे उघड न केल्यामुळे तसेच सदर गुन्ह्यात ५८ मोटारसायकल सापडल्याची माहिती मिळत असल्याने पोलिसांच्या या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभा राहत आहे.

  पोलीस प्रशासनाने १० जूनला पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मगदूम यांना एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा संशय आल्याने त्यांनी सदर गुन्हेगारावर पाळत ठेवून त्याच्याकडून चोरलेल्या नऊ मोटरसायकल मिळवल्या. आणखी काही मोटरसायकल माळशिरस तालुक्यातील मोरोची येथे विकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तेथील पोलिस प्रधानाच्या मदतीने दुसरा आरोपी ताब्यात घेतला. त्याने आपल्या मित्राकडे व पुतण्याकडे काही मोटरसायकल विकण्यासाठी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १६ मोटारसायकल ताब्यात घेतल्या. यातील काही मोटारसायकल घाणंद, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली या ठिकाणी विक्रीसाठी पाठवल्या होत्या.

  पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी उबाळे यांना मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाणे गुरनं. ३७६/२०२१ प्रमाणे तपास केला असता, मोरोची, ता. माळशिरस येथील सराईत आरोपी हा पंढरपूर व इतर ठिकाणाहून चोरलेल्या मोटारसायकल विक्री करत आहे. त्याच्या नावे अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मिळाल्याने, आरोपींना पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून शिताफीने पकडले.

  या मोटरसायकल चोरी व विक्रीच्या प्रकरणात पंढरपूर शहर व ग्रामीण पोलिसांनी जिल्हा सांगली व जिल्हा सोलापूर तसेच या ठिकाणाहून मोटरसायकल हस्तगत केल्या. या प्रकरणात अनेक लोकांची नावे यापुढे निष्पन्न होणार असल्याने या प्रकरणाचे व्याप्ती वाढत असल्याचे पाहून सोलापूर मुख्य पोलीस अधीक्षक वैशाली सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर गुन्ह्याबद्दल माहिती दिली.

  एक लाखाची बुलेट दहा हजारात

  यातील एका आरोपीने सुमारे एक लाख रुपये किंमतीची बुलेट मोटरसायकल केवळ दहा हजार रुपयात विकल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील काही आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सदर फरार आरोपी यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये दरोडे, बलात्कार, खंडणी, धमकी देणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

  फलटण पोलीस ठाणे, नातेपुते पोलीस ठाणे दहिवडी पोलीस ठाणे, माळशिरस पोलीस ठाणे, वालचंद नगर पोलीस ठाणे अशा ठिकाणी सदर गुन्हे यापूर्वी दाखल असून पंढरपूर परिसरातील गुन्ह्यांबाबत अधिक माहिती मिळवून त्यास अटक करण्यासाठी पोलिस पथके प्रयत्न करीत आहेत. आज अखेर या प्रकरणी मोटरसायकल चोरी व विक्री प्रकरणात चार आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सातपुते यांनी माहिती देताना सांगितले आहे.