श्री विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नाला ४२ कोटींचा फटका ; कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम

कोरोनाच्या काळात लॉकडाउनमुळे आषाढी सोहळा तसेच इतर यात्रा व दर्शन व्यवस्था ठप्प झाल्याने पंढरपुरातील अर्थकारण पूर्ण कोलमडून गेले आहे. याच बरोबर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटलेले आहे. या काळात सुरु असलेल्या दर्शन व्यवस्थेतून मंदिराला केवळ सहा कोटी रुपये उत्पन्न जमा झाले. यापैकी पन्नास लाखांच्या देणग्या या ऑनलाईन पद्धतीने मिळाल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

    पंढरपूर  :  कोरोना काळात शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांवर मोठा परिणाम झाला असून, यामुळे गेल्या सोळा महिन्यात केवळ सहा कोटी रुपये दान रूपाने जमा झाले आहेत. या काळात विठ्ठल मंदिर समितीस जवळपास ४२ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले आहे, अशी माहिती विठ्ठल मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
    कोरोना व लॉकडाऊनचा फटका सर्व क्षेत्रात बसलेला दिसत आहे. त्याचा परिणाम धार्मिक स्थळांवर देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. १७ मार्च २०२० पासून कोरोना काळ सुरू झाल्यानंतर लावल्या गेलेल्या लॉकडाऊन नंतर १६ नोव्हेंबर २०२० ला मंदिरे पुन्हा खुली झाली. परंतु मोजक्याच लोकांना आणि भाविकांना पदस्पर्श दर्शन ऐवजी मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले होते. यानंतर कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेमध्ये मंदिरे आणि दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली.
    कोरोनाच्या काळात लॉकडाउनमुळे आषाढी सोहळा तसेच इतर यात्रा व दर्शन व्यवस्था ठप्प झाल्याने पंढरपुरातील अर्थकारण पूर्ण कोलमडून गेले आहे. याच बरोबर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटलेले आहे. या काळात सुरु असलेल्या दर्शन व्यवस्थेतून मंदिराला केवळ सहा कोटी रुपये उत्पन्न जमा झाले. यापैकी पन्नास लाखांच्या देणग्या या ऑनलाईन पद्धतीने मिळाल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
    कोरोना काळातही अनेक भाविक विठोबाच्या चरणी दान अर्पण करीत आहेत. तर काही भाविक पंढरीत येऊ शकत नसल्याने त्यांच्या गावी जाऊन समितीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून दिलेल्या स्वीकारल्या आहेत. मंदिराचे उत्पन्न घटले असले तरी कोरोना काळात समितीच्या वतीने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. कोरोनाच्या पहिला लाटेमध्ये पंढरी मध्ये अडकलेल्या जवळपास दोन हजारांहून अधिक तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची व भोजनाची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात आली होती. कोरोनाकाळात भाविक पंढरीत येत नसल्याने जे भिक्षेकरी उपाशी पोटी रहात होते, त्यांना मंदिराच्या अन्नछत्रातून रोज दोन वेळा भोजनाची पाकिटे पोहचवून मदत करण्यात आली. याचबरोबर मंदिराने बरूड येथील जनावरांना चारा व पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. मंदिर समितीने आपल्या भक्तनिवासचे दरवाजे रुग्णांसाठी उघडून डॉक्टरांना राहण्याची चांगल्या प्रकारची व्यवस्था केली. शासकीय रुग्णालयात हाय फ्लो ऑक्सिजन मशीनसाठी दहा लाखांची मदत केली. याशिवाय २०० बेड विनाशुल्क देऊन केले. पीपिई कीट मास्क, सेनिटायझर देऊ केले आहेत. या सेवा कार्यासाठी मंदिर समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, तसेच कार्यकारी अधिकारी जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.