अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना ५० लाख विमा

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उपस्थितीत कोविडमुळे मयत झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या वारसांना ५० लाख रूपये विमा लाभ देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वाती शटगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा परिषद सदस्य थोरात, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी आल्लडवाड उपस्थित होते.

    कोरोना प्रादुर्भाव कालावधीत सर्व्हेक्षण व इतर सेवांचा लाभ लाभार्थीना देताना कोविडमुळे सोलापूर जिल्ह्यातील दोन अंगणवाडी सेविका मयत झालेल्या होत्या. अक्कलकोट प्रकल्पातील सेविका सगरी व वैराग प्रकल्पातील सेविका गुरव अशा मयत झालेल्या सेविकांची नावे आहेत. सेविकांच्या वारसदारांना महिला व बालविकास विभागामार्फत विमा स्वरूपात ५० लाख रुपये प्रत्येकी असा लाभ यापूर्वी मंजूर झाला आहे. पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते वारसदारांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

    कोरोना कालावधीत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी मोलाचे कार्य केले आहे. सर्व्हेक्षण असो आरोग्य तपासणी कँपचे नियोजन, यात सेविकांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी व माझे मुल माझी जबाबदारी या अभियानामध्ये देखील सेविकांनी सक्रीय सहभाग नोंदविला आहे.