कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांकडून ६ लाख ७७ हजारांचा दंड वसूल

  मोहोळ : कोरोना महामारीच्या काळात विनाकारण बाहेर पडण्यासह नियम मोडणाऱ्यांकडून ६ लाख ७७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एक महिन्यात १९१८ गुन्हे नोंदवून ही कारवाई करण्यात आल्याचे मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले. अवैध दारू, जुगार व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत वाळूसह वाहने अशी दीड कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

  कोरोना महामारीच्या कालावधीत दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. या स्थितीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केल्याने चेन ब्रेक करण्यास चांगली मदत झाल्याचेही सायकर यांनी सांगितले.

  १ मे ते ३१ मे एक महिन्याच्या कालावधीत मोहोळ शहरातील शिवाजी चौक, कन्या प्रशाला चौक व कुरुल चौक दूरक्षेत्र बीटमध्ये पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, फौजदार संतोष माने, खापरे, नीलेश देशमुख, मुन्ना बाबर, शरद डावरे, गणेश पोपळे, जाधव, पवार, आदींसह होमगार्ड यांनी खालीलप्रमाणे कारवाई केली आहे.

  १) विनामास्क फिरणारे व्यक्ती ७०६ दंड रु ३ लाख ५३ हजार

  २) सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १३४ दंड रु २६ हजार ८००

  ३) सोशल डीस्टंशिंगचे पालन न करणे ३३९ दंड रु ३३ हजार ९००

  ४)कोविड संबंधी एम व्ही ऍक्ट १०१ केसेस दंड रु ४० हजार

  ५)भा द वि १८८ ची कारवाई ६६ – ८५ आरोपी

  ६)मोटार सायकलवर दोघेजण प्रवास करणारावर कारवाई ३२३ दंड १ लाख ६१ हजार ५०० रुपये

  ७)सील केलेल्या आस्थापना एकूण ४

  ८)विनाकारण फिरणारे ६४ दंड ३२ हजार रुपये

  ९)खाजगी बस मध्ये ५० टक्क्यापेक्षा जास्त प्रवाशी भरून प्रवास करणाऱ्या बसची संख्या ३ दंड रु ३० हजार

  एकूण कारवाई १९१८ दंड रक्कम रु ६ लाख ७७ हजार २०० फक्त

  कोरोना काळात मोहोळ पोलिसांची विशेष मोहीम

  लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीच्या ४७ केसेस करीत २ लाख ५१ हजार १६२ रुपये मुद्देमाल जप्त केला. जुगाराच्या नऊ केसेस करून ११ हजार ६६० रोख रक्कम जप्त केली. अवैध वाळूच्या सात केसेस करून १५ आरोपींना अटक केली. १५० ब्रास वाळूसह १० ट्रॅक्टर, १ जे.सी.बी. असा सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे.