गुरुजींनी घरासमोर लावली होती दुचाकी; चोरटे आले अन् नेली पळवून !

मंगळवेढा शहर परिसरातील पटवर्धननगर येथून एका गुरुजींची घरासमोर लावलेली होंडा शाईन दुचाकी चोरट्यांनी लॉक तोडून पळवून नेल्याची घटना घडली.

    मंगळवेढा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मंगळवेढा शहर परिसरातील पटवर्धननगर येथून एका गुरुजींची घरासमोर लावलेली होंडा शाईन दुचाकी चोरट्यांनी लॉक तोडून पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मागील चार दिवसांत घरासमोर लावलेल्या तीन दुचाक्या चोरट्यांनी पळविल्यामुळे दुचाकीचालक धास्तावले असून, पोलिसांना अद्याप एकही दुचाकी न सापडल्यामुळे दुचाकी नेमक्या कुठे लावायच्या असा प्रश्‍न पडला आहे.

    मंगळवेढा शहर परिसरातील पटवर्धननगर येथून फिर्यादी तथा जि.प.शिक्षक शामराव मारुती सरगर यांनी त्यांची दुचाकी (एमएच 13 बी एफ 1222) शनिवारी (दि.9) रात्री 11 च्या सुमारास हँडल लॉक करून घरासमोर लावून झोपी गेले होते. सकाळी सव्वासहाला उठल्यानंतर ती दुचाकी जाग्यावर दिसली नाही. त्या दुचाकीचा शहर परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून न आल्याने चोरट्यांनी चोरून नेल्याची खात्री पटल्याने पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार तुकाराम कोळी हे करीत आहेत.

    दरम्यान, मागील आठवड्यात ग्रामसुरक्षा यंत्रणेची नुकतीच बैठक झाली असून, यामध्ये चोर्‍या होवू नयेत यासाठी गावपातळीवर ग्रामसुरक्षा दल स्थापन करून सतर्क राहण्याचे आदेश पोलिस प्रशासनाने केले असताना चोरट्यांनी आता आपला मोर्चा घरासमोर लावलेल्या मोटरसायकलींकडे वळविला आहे. मागील चार दिवसात एकंदरीत तीन मोटरसायकली चोरीला गेल्याची नोंद पोलिस ठाण्यात नोंदविली गेली आहे. यापूर्वीही अनेक मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत. याचा तपास लावण्यात पोलिसांना अद्यापही यश न आल्याने चोरटयांचे फोफावत चालले आहे.

    पोलिसांनी आधुनिक तंत्राचा वापर करून मंगळवेढयात होणार्‍या मोटरसायकल चोर्‍या थांबवून मोटरसायकलस्वारांना भयमुक्त करावे, अशी मागणी होत आहे. सध्या अनेकांकडे दुचाकी असल्याने दुचाकीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.