धक्कादायक ! अवघ्या चारशे रुपयांसाठी तरुणाच्या डोक्यात घातला दगड

    सोलापूर : चारशे रुपयांसाठी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला जखमी केल्याची घटना ४ जूनला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बापुजीनगर, शांती नगर येथे घडली. याप्रकरणी बाबू खाजप्पा मुंगली (वय २४,रा. बापुजी नगर, शांती नगर, सोलापूर) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून राहुल हनुमंतू मंजुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी बाबू मुंगली हा त्याच्या घराजवळ राहणारा राहुल मंजुळे यांच्या घरी जाऊन म्हणाला की, तुझा भाऊ परमेश्वर याने माझे चारशे रुपये घेतले आहे. ते मी त्यास मागितले असता त्याने मला तुझ्या जवळून घे असे सांगितले आहे. त्यावेळी फिर्यादीने राहुल याला चारशे रुपये दे असे म्हटले. राहुल याने कसले पैसे म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून रस्त्यावर पडलेला दगड डोक्यात मारून गटारीत ढकलून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.