वाहून गेलेल्या ‘त्या’ कामगाराचा अद्याप पत्ता नाहीच !

दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी सात ते आठ कामगार आष्टे बंधाऱ्याजवळ खडकावरून उतरले. तेव्हा सौरभ हा पाण्यात पडला होता.

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दीड दिवसाचा गणपती विसर्जनासाठी गेलेला कोळेगाव येथील रेल्वेच्या स्लीपर फॅक्टरीतील तरुण कामगार वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास आष्टे बंधाऱ्याजवळ घडली होती. ३० तासानंतरही सौरभ सुभाष बेंबळघे (वय, १८, रा. लातूर) हा तरुण सापडला नाही.

    कोळेगाव येथे रेल्वे रुळासाठी लागणारे सिमेंट खांब तयार करण्याचा कारखाना आहे. तेथील कामगारांनी एकत्रित येऊन गणरायाची प्रतिष्ठापना केली होती. दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी सात ते आठ कामगार आष्टे बंधाऱ्याजवळ खडकावरून उतरले. तेव्हा सौरभ हा पाण्यात पडला होता. पोलिस प्रशासनासह स्थानिक नागरिक आणि कोळेगाव येथील मच्छिमारांनी रविवारी सकाळी ११ पासून सायंकाळी पाचपर्यंत आप्टे बंधाऱ्यापासून शिरापूर, लांबोटीच्या जुन्या पुलापर्यंत त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. रात्र होऊ लागल्याने शोधमोहीम थांबवावी लागली.

    पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी सीना नदीकाठच्या गावातील पोलिस पाटील, मच्छिमारांसह शेतकऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. अशाप्रकारे पाण्यात वाहून आलेल्या व्यक्तीची माहिती असल्यास तात्काळ मोहोळ पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.