Black money

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : तुमचे पैसे पलीकडे पडले आहेत, असे भुलवून दुचाकीवर बसत असलेल्या अनगर येथील एकाचे तीन लाख ९७ हजार रुपये चोरट्याने पळवले. हा चोरटा तोंडाला काळीपट्टी बांधून आला होता. शुक्रवारी (दि. १७) दुपारी दीडच्या सुमारास येथील कुरुल रस्त्यावरील स्टेट बँकेसमोर हा प्रकार घडला.

    शंकर राजाराम व्होनमोटे (रा.अनगर, ता. मोहोळ) यांनी दहा वर्षांपूर्वी भारतीय स्टेट बँकेतून पॉलिसी घेतली होती. त्याचा कालावधी पूर्ण झाल्याने तीन लाख ९७ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले. ती रक्कम काढून अनगरच्या पतसंस्थेत मुदत ठेवीवर ठेवण्यासाठी ते शुक्रवारी दुपारी कुरुल रस्त्यावरील स्टेट बँकेच्या शाखेत आले होते. त्यांनी धनादेशाद्वारे खात्यातून रक्कम काढली. त्यानंतर तेथेच बसून ती मोजली. दीडच्या सुमारास ती सर्व रक्कम एका पिशवीत घेऊन ते बँकेसमोर लावलेल्या दुचाकीजवळ आले.

    दुचाकीला पिशवी अडकवून निघण्याच्या तयारीत असतानाच तोंडाला काळी पट्टी बांधलेला एक २५ वर्षीय युवक त्यांच्याजवळ आला. त्याने तुमचे पैसे पलीकडे पडल्याचे सांगितले. त्यामुळे ते दुचाकीवरून उतरून तिकडे पाहात असल्याची संधी साधत चोरट्याने गाडीला अडकवलेली पैशांची पिशवी घेऊन पोबारा केला. याप्रकरणी शंकर व्होनमोटे यांच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.