सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरकडे भरधाव वेगात जात असलेल्या लक्‍झरी बसने चंद्रमौळी एमआयडीसी चौकातून कंपनीकडे वळत असलेल्या दुचाकीचालकाला जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

    याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सचिन बाबुराव देशमाने (वय-३९ रा. बामणी, ता. तुळजापूर (हल्ली रा. मोहोळ) हे गेल्या सात वर्षांपासून मोहोळ येथील चंद्रमौळी एमआयडीसी येथे ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. दरम्यान २६ ऑगस्टला सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या मोटारसायकल क्रमांक एमएच २५ ए सी ९०१४ वरून त्यांचा लहान मुलगा पृथ्वीराज सचिन देशमाने याला घेऊन कंपनीकडे निघाले होते. ते दोघे मोटरसायकलसह सिग्नल चौकातून कंपनीकडे वळत असताना मोहोळ ते सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या लक्झरी बस (क्रमांक एमएच १२ क्यू जी ९०१६) ने धडक दिली.

    त्यामुळे दुचाकीवरील चालक सचिन देशमाने हे रोडवर पडल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा पृथ्वीराज देशमाने या प्रकाराने घाबरून गेला आहे. अपघातानंतर लक्झरी बसच्या चालकाने पलायन केले. त्यामुळे लक्झरी बसच्या चालकाविरोधात पांडुरंग सिद्धेश्वर देशमाने (रा. मोहोळ) यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश शिंदे हे करीत आहेत.