झेडपी शिक्षकाच्या बदलीने सीईओंच्या अडचणी वाढल्या

  सोलापूर : शासन स्तरावर शिक्षकाच्या बदली करण्यासंदर्भातील कोणताही आदेश नसताना मर्जीतल्या झेडपी शिक्षकाची प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांनी बदली केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. मर्जीतील शिक्षकाची दिशाभूल अहवाल सादर करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आदेश प्राप्त करुन घेतल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

  बेकायदेशीर बदली केल्याप्रकरणी संजय कुमार राठोड यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना आणि जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी केली आहे. दरम्यान राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेनी बदली विरोधात ग्रामविकास मंत्रालयात धाव घेतली.

  एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षक गैरसोयीचे बदलीने त्रस्त असताना दुसरीकडे सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी स्वतःचा मनमानी कारभार करून मर्जीतील नातलगाच्या हव्या तशा बदल्या करून घेत आहेत. यापूर्वी त्यांनी स्वत:च्या पत्नीची बदली सोयीने घरापासून एक किलोमीटर अंतरावर करून घेतली. तर एका नातलगाची बदली तीन वेळ सोयीने केली.

  आता पुन्हा त्यांनी आणखी एका मर्जीतील नातलगाला नेहरू वसतिगृह व सावित्रीबाई फुले वसतिगृह यांचा अतिरिक्त पदभार देऊन सोयीच्या ठिकाणी पूर्णतः नियमबाह्य बदली केली आहे. एस पी चव्हाण नावाचे नातलग हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव या ठिकाणी कार्यरत होते. वसतिगृहाचा कारभार सांभाळत होते. अगोदरच ते वसतिगृहाचा कारभार सांभाळत असल्याने शाळेवर कधीही जात नाहीत म्हणजे अगोदरच त्यांना जावयाप्रमाणे वागणूक असताना आता पुन्हा त्यांची बदली उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमान्यनगर या ठिकाणी करण्यात आली आहे.

  उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमान्य नगर या शाळेत दोनच उपशिक्षकाची पदे मंजूर आहेत. तिथे तिसरे पद मंजूर नसताना त्या ठिकाणी त्यांची अतिरिक्त शिक्षक म्हणून सोय केली आहे. परंतु त्याठिकाणी असणार्‍या कार्यरत शिक्षकावर अतिरिक्त होऊन बदली होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

  येत्या काळात या शिक्षकाचा आदेश रद्द करून सामान्य शिक्षकाला न्याय व सबंधित अधिकारी यांनी यापुढे गैरवर्तन केल्यास सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.

  – किरण काळे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, सोलापूर