onion

    सोलापूर : सध्या सोलापूर शहर अनलॉक झाले असले तरी तमिळनाडू, आंध्र, कर्नाटक व केरळ राज्यात लॉकडाऊन आहे. या राज्यात अनलॉक झाल्यास कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर कृृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा प्रति क्‍विटंल ५०० रूपयांपासून २५०० रूपयापर्यंत आहे.

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची दररोज ९० ते १०० ट्रकची आवक होत आहे. मागील वर्षी याच हंगामात कांद्याचा दर एक हजार रूपयापर्यंत होता. यंदा कांद्याचा दर बर्‍यापैकी आहे. सोलापूर शहराला जास्तीत जास्त दररोज ५ ते ७ कांद्याचा ट्रक पुरेशा आहेत. परंतु, सोलापूरच्या बाजारात आलेला कांदा परराज्यात मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व केरळ राज्यात कांदा जातो. मात्र, सध्या या राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतच येथील बाजार सुरू आहे. त्यामुळे तामिळनाडू येथे देखील कांद्याचा दर स्थिर आहे. मात्र, १५ जूननंतर येथे अनलॉक झाल्यास कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, लॉकडाऊनमुळे कांद्याचा दर खूपच खाली घसरला होता. १०० ते १ हजार रूपये प्रति क्‍विटंल कांद्याचा दर होता. अनलॉक झाल्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या सोलापूरच्या बाजार समितीमध्ये पुणे जिल्ह्यातून, भिंगवण, करमाळा व सोलापूर जिल्ह्याच्या आजूबाजूच्या गावातून येत आहे.

    दर आणखी वाढतील

    गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर, पुणे, मुंबई येथे संपूर्ण अनलॉक झाले आहे. परंतु ज्यावेळी कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथील बाजारपेठ पूर्ण काही वेळच सुरू आहे. त्यामुळे परराज्यातील बाजारपेठ पूर्णवेळ सुरू होईल. त्यावेळी कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे, असे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदार उबरंजे यांनी सांगितले.