पंढरपुरातील संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आमदार परिचारक, आवताडेंनी केली ‘ही’ मागणी

    पंढरपूर : कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांत पंढरपूर यात्रा न भरल्यामुळे पंढरीतील व्यापारीवर्ग अडचणीत आहे. पंढरीतील व्यापारीवर्गाला मदत करण्यासाठी सात दिवसांऐवजी १९ जुलै ते २१ जुलै अशा तीन दिवसांची मर्यादित संचारबंदी लागू करावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

    गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आषाढी यात्रा काळात तसेच वर्षभर परगावाहून विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पंढरीत येण्यापासून प्रशासनाने रोखले होते. यामुळे प्रासादिक वस्तू विकणारे मंदिर परिसरातील व्यापारी तसेच या यात्रेवर अवलंबून असणारे इतर उद्योजक व व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा नियम व अटी घालून आषाढी सोहळा एसटी बसेसद्वारे प्रतिकात्मक साजरा करण्यास शासनाने परवानगी दिली असली, तरी पंढरपूर शहर व परिसरातील इतर नऊ गावांमध्ये सात दिवसांची संचारबंदी लागू केल्यामुळे पंढरीतील व्यापाऱ्यांचे पुन्हा नुकसान होणार आहे.

    पंढरपूर परिसर त्रिस्तरीय नाकाबंदी करून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तसेच परगावाहून येणाऱ्या एसटी बसेस, खासगी वाहने जागोजागी अडवण्यात येणार आहेत. यामुळे पंढरपूर शहरात मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार नाहीत. याचा विचार करून शासनाने सात दिवस संचार बंदी लागू केलेली आहे, त्यात बदल करून १९ जुलै २०२१ ते २१ जुलै २०२१ या काळापुरती संचारबंदी मर्यादित ठेवून व्यापाऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी परिचारक व आवताडे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.