सोलापूरात काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन; शेकडो कार्यकर्ते ताब्यात

  सोलापूर : सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या अन्यायी दरवाढ करून देशातील नागरिकांना त्रास देऊन महागाईत लोटणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  शहाराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सात रस्ता, नवल, सुपर, मोदी, चडचनकर, कोंडी, म्हेत्रे वस्ती नई जिंदगी, जिगजिनी, श्रीराम, कुंभार वेस, पारशी विहीर नई जिंदगी, कोनापुरे चाळ, मेकानिकी चौक अशा एकूण १३ ठिकाणी निदर्शने आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या निदर्शने आंदोलनावेळी सुमारे दोनशे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

  शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून, डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच सुरु राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत.

  मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या स्वरुपात कोट्यवधी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. यूपीए सरकार सत्तेवर असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ९.४८ रुपये होती. ती आज ३२.९० रुपये म्हणजे २५८ टक्के आहे. तर डिझेलवर ३.५६ रुपये होती ती आज ३१.८० रुपये आहे म्हणजे ८२० टक्के वाढ झाली आहे. या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षात तब्बल २० ते २५ लाख कोटी रुपयांची लुटमारी केली आहे.

  तसेच २००१ ते २०१४ या चौदा वर्षांच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रतिलिटर १ रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. २०१८ मध्ये १८ रुपये प्रतिलिटर केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर १८ रुपये सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर २.५० तर डिझेलवर प्रति लिटर ४ रुपये कृषी सेस घेतला जातो.

  पुढे बोलताना वाले म्हणाले की, केंद्रात डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसप्रणित यूपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरपेक्षा जास्त प्रति बॅरल असतानाही देशांतर्गत किमतीवर त्याचा परिमाण होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ६४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत.

  मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे, मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात आज रोजी सोलापूर शहरात १३ पेट्रोल पंपावर निदर्शने आंदोलन करण्यात आले आणि दरवाढ कमी करण्याची मागणी करत आहोत.

  या निदर्शने आंदोलनात कार्याध्यक्ष अरुण शर्मा, माजी महापौर अलकाताई राठोड, नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेविका वैष्णवीताई करगुळे,  स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, नरसिंग कोळी, हाजी तौफिक हत्तुरे, परवीन इनामदार, हेमाताई चिंचोळकर,  नलिनीताई चंदेले, अंबादास करगुळे, सुदीप चाकोते यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्तांसह नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते.