सोलापूर विद्यापीठातील एमबीए विभागाच्या नव्या दुसऱ्या तुकडीला एआयसीटीईची मान्यता

    सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील एमबीए विभागाच्या नवीन दुसऱ्या तुकडीला नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांच्याकडून मान्यता मिळाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. आता विद्यापीठातील एमबीए विभागात विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता 60 वरून 120 इतकी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

    विद्यापीठात वाणिज्य व व्यवस्थापन संकुल अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून एमबीए अभ्यासक्रमाची नव्याने सुरुवात करण्यात आली असून, यास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद आहे. सोलापूर जिल्हा व परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व्यवसायिक शिक्षण अल्प शुल्कामध्ये घेण्याची संधी यामुळे प्राप्त झाली आहे. विविध विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबवल्यामुळे अल्पावधीतच या संकुलाचा नावलौकिक वाढला आहे. त्यामुळे सोलापुरातीलच नव्हे तर उस्मानाबाद, अमरावती, बीड, लातूर, नांदेड अशा इतर जिल्ह्यातून विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेऊ लागले आहेत.

    विद्यापीठात एमबीएसाठी एकूण 60 विद्यार्थ्यांची एक तुकडी होती. येथे गुणवत्तायादीनुसार प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे विद्यापीठात प्रवेश क्षमता वाढवावी, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत होती. यामुळे 60 विद्यार्थ्यांची वाढीव तुकडीची मागणी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन सोलापूर विद्यापीठास 60 प्रवेश क्षमतेची वाढीव तुकडी मंजूर करण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठातील एमबीए प्रवेश क्षमता 120 इतकी झाली आहे. याचा सोलापूर व परिसरातील एमबीएचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली.

    सीईटी परीक्षेसाठी 22 जुलैपर्यंत अर्जाची मुदत

    तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2021- 22 साठी एमबीए प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली MH-CET परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2021 पर्यंत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसंदर्भात किंवा त्यांना एमबीए अभ्यासक्रमाबाबत माहिती हवी असल्यास त्यांनी डॉ. अमोल गजधाने (9403479410) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.