विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाबरोबरच मंदिरात आता पुरातन मूर्तीचे लाभणार भाविकांना दर्शन

    पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्राची दक्षिण काशी अशी ओळख असणाऱ्या पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाबरोबरच भाविकांना आता पुरातन मूर्तींचे दर्शनही लाभणार आहे. यासाठी मंदिर समितीने सभामंडपात काचेचे दालन उभारले आहे. या ठिकाणी काचेच्या दालनात ठेवण्यात येणार असून, भाविकांना पाहता येईल व त्यांचे दर्शन घेता येईल सुमारे सातशे ते एक हजार वर्षांपूर्वीच्या विविध धातूंपासून बनवलेल्या अतिशय सुंदर व आकर्षक अशा या मूर्त्या असून काही मूर्ती एक ते दोन फूट उंचीच्या व काही लहानशा अशा सुमारे ८० मूर्तींच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

    पूर्वी नामदेव पायरी जवळ ३३ कोटी देवतांचे छोटे मंदिर होते. या ठिकाणी बैरागी समाज या देवतांची पूजा करत होते. पूर्वीपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक, आंध्र , तामिळनाडू, गुजरात, राज्यातील विठ्ठल भक्त पंढरीत येत होते काहींच्या घरामध्ये असलेल्या मूर्तींची पूजा करण्यास अडथळा येत असल्याने अथवा इतर काही कारणामुळे मूर्तीची पूजा होऊ शकत नसल्याने लोक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अथवा नदीमध्ये अशा मूर्तींचे विसर्जन करत होते. मात्र, पंढरपुरात आल्यानंतर नामदेव पायरी लगत असलेल्या ३३ कोटी देवतांच्या मंदिरात अशा मूर्ती दिल्या जात होत्या. त्या मूर्ती बैरागी स्वीकारत होते. त्यामुळे त्यांचे पूजनही तेच करत होते. दरम्यान, संत नामदेव महाद्वाराचे बांधकाम मंदिर समितीने सन १९९७ ला सुरू केले तेव्हा ते ३३ कोटी देवतांचे मंदिर पाडावे लागले. त्यावेळी तिथे असलेल्या मंदिरातील सुमारे अडीचशे ते तीनशे मूर्ती मंदिर समितीने आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. या मुर्त्यांची पूजा समितीकडून करण्यात येत होती. यामध्ये विविध देवतांच्या मूर्त्या होत्या.

    श्री विठ्ठल रुक्मिणी, गणपती, श्रीकृष्ण ,बालाजी, श्रीविष्णु, लक्ष्मीदेवी अशा देवतांच्या मूर्त्या एक ते दोन फूट उंचीच्या अशा कोरीव सुंदर मूर्ती आहेत. सदर मुर्त्या पंचधातूमध्ये तसेच तांबे, पितळ अशा धातूत बनवलेल्या आहेत. या मुर्त्या मंदिर समितीने जतन केल्या होत्या. यातील निवडक ८० मूर्ती स्वच्छ करण्यात आल्या असून, भाविकांना पाहण्यासाठी मंदिरातील सभामंडपाच्या एका ओवरीमध्ये काचेचे दालन बनवण्यात आले. त्या ठिकाणी त्या मुर्त्या ठेवल्या जाणार आहेत. यामुळे मंदिरात भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनासाठी आल्यानंतर सभामंडपात असलेल्या ओवरीमध्ये पुरातन मूर्तींचे दर्शनाचा लाभ मिळणार आहे.

    सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे दर्शनासाठी भाविकांना बंद आहे. परंतु जेव्हा भाविकांसाठी विठ्ठलाचे दर्शनाकरिता मंदिर खुले होईल. तेव्हा त्या भाविकांना मंदिरात आल्यानंतर या विविध धातू व वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या पाहण्याची संधी लाभणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे अशा विविध देवतांच्या सुमारे तीनशे मुर्त्या आहेत. परंतु त्यापैकी सुंदर कोरीव व रेखीव अशा ८० मुर्त्या भाविकांना पाहता येईल, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.