करमाळ्यात ऑईलचा ट्रक पेटला

ट्रकमधील वायरिंगचे शॉर्टसर्किट झाल्याने ट्रकमध्ये असलेल्या ऑईलने अचानक पेट घेतल्याने सकाळी अकराच्या सुमारास आग लागली.

    करमाळा : करमाळा शहराजवळ साधारण एक किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीरंग पेट्रोलपंपाजवळ नगर येथून आलेला ऑईलने भरलेला ट्रक दुर्घटनाग्रस्त झाला. हा ट्रक नगर करमाळा महामार्गावर होता. या ट्रकमधील वायरिंगचे शॉर्टसर्किट झाल्याने ट्रकमध्ये असलेल्या ऑईलने अचानक पेट (Fire in Karmala) घेतल्याने सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. पण याबाबत ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्याने या ट्रकला रोडच्या साईडला घेतले व या ट्रकमधून खाली उडी मारली.

    यानंतर आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी त्वरीत प्रसंगसावधान दाखवत करमाळा येथील नगरपालिकेमध्ये फोन करून या गोष्टीची कल्पना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

    या दरम्यान हा ट्रक निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात जळून खाक झाला होता. यामुळे आकाशात ऑईलमुळे मोठ्या धुराचे लोट उंचीवर पोहोचले होते. हा ट्रक बाजूला घेतल्याने या महामार्गावरच्या वाहतुकीत कुठल्याही प्रकारचा खंड पडला नाही. परंतु ही  आग आटोक्यात येईपर्यंत काही काळ वाहतूक पोलीस प्रशासनाने थांबवून ठेवली होती. मात्र, या दुर्घटनेत ट्रकमधील लाखो रुपयांचे ऑईल पूर्णपणे जळून खाक झाले होते. यामुळे संबंधित कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समजते आहे.