झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी दिला अँड्रॉइड मोबाईल

    पंढरपूर/दिनेश खंडेलवाल : पंढरपूर शहरामध्ये गोरगरीब गरजू लोकांपर्यंत अन्न पुरवणारी रोबिंहूड संस्था कार्य करते. या संस्थेची रोबिंहूड ॲकॅडमी अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य केले जाते. या माध्यमातून झोपडपट्टीत राहणाऱ्या १५ ते २० मुलांना गेल्या वर्षभरापासून लॉकडाउनच्या कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू होते.

    सरकारने हळूहळू अनलॉक सुरू केले असल्याने पंढरपूरमधील सर्व शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहेत. घरची आर्थिक व बिकट परिस्थितीमुळे अँड्रॉइड मोबाईल घेणे विद्यार्थ्यांच्या पालकांना शक्य नसल्याने रॉबिनहूड ॲकॅडमीमार्फत सोशल मीडियावर या गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाइल देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या या आवाहनाची पंढरपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय बाबा यांनी त्वरित दखल घेत झोपडपट्टीतील मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी रोबिंहूड ऍकॅडमीचे दीपक सगर यांच्याकडे सॅमसंग कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल सपूर्द केला.

    पंढरपूर शहरातील कॉलेज चौक परिसरात असणाऱ्या झोपडपट्टी येथे राहणाऱ्या १५ ते २० मुलांना रोबिंहूड अकॅडमी ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देत होते. परंतु कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता यावर्षी त्यांनीही ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणार आहेत यासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांना अँड्रॉइड मोबाईल शिक्षणासाठी उपलब्ध व्हावा, याकरिता आवाहन करण्यात आले होते. मात्र, पंढरपूर शहरात कुठेही गरजवंतांच्या मदतीसाठी धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते संजय बाबा यांनी आजपर्यंत ज्या लोकांची दुकाने आगीत भस्म झाली अशा लोकांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्याचबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी मदत केली.