सदोष मोबाईल पुरवठ्याविरोधात अंगणवाडी सेविका संतप्त; मोबाईल वापसी आंदोलन केले

  मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अंगणवाडीचे कामकाज अधिक जलद व सुखकर व्हावे यासाठी पाठीमागील सरकारच्या वतीने अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आले होते. मात्र, काही वर्षानंतर या मोबाइलच्या संदर्भात अंगणवाडी सेविकांच्या तक्रारी वाढल्या असून, अंगणवाडी कामकाजासाठी शासनाने दिलेले मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. जुने झाल्यामुळे सतत नादुरुस्त होत आहेत. दुरुस्तीसाठी ३ ते ४ हजार रुपयांचा खर्च अंगणवाडी सेविकांचा होत आहे. शासनाने दिलेले सर्व जुने मोबाईल परत घ्यावेत. नवीन व चांगल्या दर्जाचे, आधुनिक मोबाईल सेविकांना देण्यात यावेत. यासह व इतर मागण्यांसाठी मोहोळ येथे अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मोहोळ पंचायत समिती समोर मोबाईल वापसी आंदोलन करण्यात आले.

  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सुर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात सुमारे ३०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

  यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात किरण सूर्यवंशी यांच्याकडे मोबाईल जमा करत निवेदन दिले. राजभाषा मराठी असताना इंग्रजीमध्ये माहिती भरण्याची जबरदस्ती करणे योग्य नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना माहिती भरण्यासाठी तयार करण्यात आलेले ॲप संपूर्णपणे मराठी करून त्यातील सर्व त्रुटी दूर कराव्यात अन्यथा ते ॲप रद्द करण्यात यावे, मोबाईलवर काम करण्यासाठी सेविका व मदतनिसांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता मिळण्यामध्ये अनियमितता आहे.

  सेविका काम करत असूनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. मोबाईलचे वाढलेले काम पाहता भत्त्यात वाढ करण्यात यावी, शासनाने दिलेल्या जुन्या मोबाईलची वॉरंटी संपली आहे. सतत नांदुरुस्त होणे यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाने दिलेले मोबाईल परत घ्यावे व नवीन चांगल्या दर्जाचे व अधिक क्षमतेचे आधुनिक मोबाईल देण्यात यावेत, केंद्र शासनाने लादलेला पोषण ट्रॅकर ॲप सदोष असून ते सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर लादले जात आहे.

  इंग्रजी न येणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना त्यात इतरांच्या मदतीशिवाय माहिती भरणे शक्य होत नाही. वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलणे, दैनंदिन करण्याचे काम भरण्याची पद्धत अतिशय किचकट आहे. त्रुटींमुळे कामात मदत होण्याऐवजी उलट ताण वाढत आहे अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले.

  यावेळी वेणू वाघमोडे, अनुसया राठोड, वनिता पाटील, शोभा कुंभार, किस्किंदा हांडे, अर्चना गावडे, उमा खराडे, कमल व्हनमाने, सकिता पाटील, सुलभा जावळे, उमा सलगर, अलका व्यवहारे, कल्पना चव्हाण, दीपाली ढोबळे, रंजना जाधव, संगीता वाघमोडे आदी अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

  हे मोबाईल जमा करून घेत असून त्याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात येणार आहे. तसेच येत्या २ सप्टेंबर रोजी अंगणवाडी युनियन कर्मचारी संघ व इतर संघटनांची बैठक होणार आहे. त्यामध्ये यावर काहीतरी तोडगा निश्चित निघेल.

  – किरण सूर्यवंशी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी