पोलीस निरीक्षक संपत पवारसह एपीआय रोहन खंडागळे अँटी करप्शनच्या जाळ्यात

भ्रमणध्वनीच्या माध्यमातून तो संपत पवार याच्याही संपर्कात होता दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानंतर विभागाच्या पथकाने परिसरात सापळा रचला. सपोनि खंडागळे याने रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

    सोलापूर: मुरुम चोरी प्रकरणातील आरोपीला सहकार्य करतो, असे सांगून तक्रारदाराकडून साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारताना सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार, सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे या दोघांना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.तक्रारदारावर मुरुम चोरीप्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

    या गुन्ह्यात मदत अन् सहकार्य करतो, असा शब्द पो. नि. संपत पवार आणि सपोनि खंडागळे यांनी दिला. त्यापोटी दोघांनी दहा लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ती रक्कम साडेसात लाखांवर आली. ठरलेली रक्कम स्वीकारण्यासाठी सपोनि खंडागळे हा पुणे रोडवरील एका ठिकाणी थांवला होता. भ्रमणध्वनीच्या माध्यमातून तो संपत पवार याच्याही संपर्कात होता दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानंतर विभागाच्या पथकाने परिसरात सापळा रचला. सपोनि खंडागळे याने रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    घराची झडती 

    सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार, सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होताच यांच्या घराची झडती घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. रात्री उशिरा घराची झडती घेण्याचे काम सुरु झाले.