सोलापूरात 20 रूग्णवाहिका खरेदीला मंजूरी

    सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २० रूग्णवाहिका खरेदी करण्याच्या प्रस्तावाला शासनस्तरावरुन मंजूरी देण्यात आली आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजातून रुग्णवाहीका खरेदी करण्यात येणार आहेत. कोरोना काळात ग्रामपंचायात विभागाच्या पाठपूराव्याला यश प्राप्त झालं आहे.

    ग्रामपंचायत विभागाने दिलेल्या माहीतीनुसार चौदाव्या वित्त आयोगा निधीच्या व्याजातून रुग्णवाहीका खरेदी करण्याचा ठराव १ नोव्हेंबर २०२० रोजी स्थायी समिती सभेत घेण्यात आला होता. ठरावाच्या अनुषंगाने शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी २९ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या शासकीय बैठकीत दिलेल्या निर्देशानूसार प्राथमिक आरोग्य केंद्र हे क्षेत्र करुन १४ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त व्याजाची रकमेतून रूग्णवाहीका खरेदी करण्याचे सुचीत केले होते.

    ६ कोटी ६२ लाखांची आवश्यकता

    सोलापूर जिल्ह्यात कोविड १९ चा वाढता प्रार्दूभाव अद्याप ओसरला नसल्याने रुग्णसेवेकरीता आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहीका अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ४५ प्राथमिक आरोग्य केंद्राना एक रूग्णवाहीका प्रमाणे १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून खरेदी करण्यास ६ कोटी ६२ लाख ४० हजारांची आवश्यकता असल्याचे ग्रामपंचायत विभागाने पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. तशी मागणी सीईओ दिलीप स्वामी यांच्या पत्राने ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचीवांकडे करण्यात आली. या प्रस्तावानुसार २० रूग्णवाहीका खरेदी करण्याची मंजूरी शासनस्तरावरुन देण्यात आली आहे.

    चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजातून २० रूग्णवाहिका खरेदी करण्याचे ग्रामविकास विभागाकडून पत्र प्राप्त झाले आहे. सीईओंच्या पत्राद्वारे ४५ रुग्णवाहिका खरेदीची मागणी करण्यात आली होती. यापैकी २ कोटी ९४ लाख ४० हजार पर्यंतचा निधी देण्यात आला आहे, असे डेप्यूटी सीईओ चंचल पाटील यांनी सांगितले.