पत्नीच्या मृत्यूची अद्यापही चौकशी न झाल्याने पतीचा उपोषण करून देहत्याग करण्याचा इशारा

    मंगळवेढा : बोराळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍याच्या निष्काळजीपणामुळे किर्ती सुतार या महिलेचा मृत्यू झाला असून, या घटनेला चार महिन्याचा कालावधी उलटूनही या तक्रारीची अद्यापही चौकशी न केल्याने 18 ऑक्टोबर मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करून देहत्याग करण्याचा इशारा किर्ती सुतार यांचे पती अशोक सुतार यांनी तहसीलदारांना दिला.

    यातील तक्रारदार अशोक सुतार यांची पत्नी किर्ती सुतार हिला 15 एप्रिल रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने तसेच अंगात ताप असल्याने कोरोना चाचणी करून घेण्यासाठी बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9.00 वा. गेलो होतो. दरम्यान, तपासणीनंतर पत्नी किर्ती व मुलगी प्रतिक्षा यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान पत्नीची अवस्था खूपच गंभीर असताना दवाखान्यातील कर्मचार्‍यांनी रेफर चिठ्ठी लिहिण्याचे कारण सांगून ओपीडी संपेपर्यंत तिष्ठत ठेवले. यादरम्यान पत्नीची प्रकृती खालावल्याने व कर्मचार्‍यांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे पत्नीला ने-आण करण्यात तिचा मृत्यू झाला.

    या मृत्यूस बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी जबाबदार असून, या घटनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अशोक सुतार यांनी केली आहे. या तक्रारी जिल्हाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, मानवाधिकार समिती यांच्याकडे करूनही अद्याप कुठलीच चौकशी चार महिन्याचा कालावधी उलटूनही झाली नाही. परिणामी, अशोक सुतार यांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी 18 आक्टोबर रोजी तहसील कार्यालय, मंगळवेढा येथे आमरण उपोषण करून देहत्याग करण्याचा इशारा दिला आहे. याच्या प्रती प्रांत कार्यालय, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, मंगळवेढा पोलीस यांना देण्यात आल्या आहेत.