मोहोळ तालुक्यातील ‘या’ गावची वाटचाल कोरोना मुक्तीकडे

    मोहोळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोहोळ तालुक्यात हॉटस्पॉट म्हणून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आष्टी गावची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरु आहे. हे सर्व गावकऱ्याच्या सामूहिक प्रयत्नामुळे सिद्ध होत आहे. आष्टी गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२० वर होती. तर १४ जणांचा मृत्यू झाला होता. पण आता केवळ एक अंकीच रुग्णसंख्या उरली आहे.

    रुग्णसंख्या कमी होण्यामागे सुयोग्य नियोजन, योग्य कार्यवाही, नियमांचे कडक पालन, जनता कर्फ्यूला सर्व ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद, टेस्टींग व लसीकरण यामुळे हे यश साध्य होताना दिसत आहे.

    जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आष्टी या गावी लोकसहभागातून उभारलेल्या कोविड सेंटरचे महत्वपूर्ण योगदान या कोरोनामुक्तीमध्ये राहिले आहे. या सेंटरमध्ये आतापर्यत आष्टीतील व इतर गावातील १७७ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी १३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

    लोकांनी आर्थिक व वस्तुरुपाने दिलेली सुमारे सव्वालाखाहून अधिकची मदत या कामी उपयोगी आली आहे. कोविड सेंटरला आष्टी दक्षता समितीचे अध्यक्ष डॉ. अमित व्यवहारे हे विशेषतः बाधित रुग्णांची स्वत: डॉक्टर असल्याने तपासणी करत आहेत.

    आष्टी गण नोडल अधिकारी विकास यादव, सहायक पवार, कोरोना दक्षता कमिटी सचिव गहिनीनाथ गडेकर, सह अध्यक्ष प्रमोद खंडागळे, पोलीस पाटील खासेराव पाटील, उपसरपंच निखील गुंड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व समिती यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी केलेले ९५५ हुन अधिक कुटूंबांचे सर्वेक्षण व २२० रुग्णांचे ९७०० संपर्क शोधून त्यांना प्रबोधन करणे, त्याचप्रमाणे आरोग्य संपर्क अधिकारी श्रद्धा एनकफळे, आरोग्य सेविका माधवी वाघमारे, बाळासाहेब सातपुते यांनी सांभाळलेले ८५३ नागरिकांचे टेस्टींग व ५४७ व्यक्तींच्या लसीकरणाचे काम आजपर्यत पूर्ण केले आहे.