भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; कार्यकर्ते-पोलिसात झटापटी

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करताना पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये तुरळक झटापटी झाली.

    ओबीसी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी निष्काळजीपणा करणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष शहर व जिल्ह्याच्या वतीने सोलापूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

    या आंदोलनात आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यंनम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सभागृहनेते शिवानंद पाटील, झेडपी सदस्य अरुण तोडकर, आनंद तानवडे, बिज्जू प्रधाने, अमर पुदाले, शंकर वाघमारे, के के पाटील, शशिकांत चव्हाण,प्रणव परिचारक यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी होते.

    यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी चिथावणीखोर भाषण देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेस नेत्यांचे पुतळे जाळा, अशा सूचना भाषणात केल्यानंतर त्वरित कार्यकर्त्यांनी लपवलेले पुतळे बाहेर काढून जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दक्ष असलेल्या पोलिसांनी पुतळे जाळण्यापूर्वीच ते हिसकावून घेतले आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.