वाळू माफियांचा उच्छाद; पोलिसालाच ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न

अवैधरित्या धंदे करणाऱ्यांवर मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिला.

    टेंभुर्णी : भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू चोरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला थांबायला सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालाच धडक देऊन ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रकार मंगळवारी (दि. २४) रात्री १२.०५ वाजण्याचा सुमारास टाकळी ता. माढा येथे घडला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक, मालकासह तिघांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मोटारसायकलसह एका बोलेरो जीपचे नुकसान झाले आहे. सुधीर सोरटे या चालकाला ताब्यात घेतले असून, महादेव लक्ष्मण शेळके, समाधान जरक (सर्व रा. टाकळी ता. माढा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

    याबाबत मंगळवारी (दि. २४) भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू चोरून घेऊन जात असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीसांना मिळाली होती. पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम शिवाजी माने-देशमुख व घाडगे हे कारवाई करण्यासाठी गेले असता. मध्यरात्री १२ वाजण्याचा सुमारास ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ४३ क्यु ३३९४ चालक सुधीर सोरटे थांबवून ट्रॅक्टर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कारवाईसाठी घ्यायला सांगितले. ट्रॅक्टरमध्ये बसलेले सुधीर सोरटे यांनी हातात टॉमी घेऊन पोलीसांचे अंगावर धावून आला व धक्काबुक्की करू लागला तर ट्रॅक्टरमालाक समाधान जरक याने ट्रॅक्टरचालकास ट्रॅक्टर पोलिसांच्या अंगावर घालण्यास सांगितले.

    चालकाने ही पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस कर्मचारी यांनी बाजूला उड्या मारल्या. यामुळे ते बचावले व ट्रॅक्टर मोटारसायकल क्रमांक एम. एच. ४५ एम. ७२७० या गाडीलरून नेला. यामध्ये मोटारसायकलचे नुकसान झाले. तसेच गावातील बाजूला उभ्या असलेल्या बोलेरो गाडी क्रमांक एम. एच. २१ व्ही. ९३६३ गाडीला धडक देऊन गाडीचे नुकसान करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने-देशमुख यांना किरकोळ मार लागला आहे.

    पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वरील तिघांविरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापुढे अवैधरित्या धंदे करणाऱ्यांवर मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिला आहे.