किरकोळ कारणावरून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; पाच जणांवर गुन्हा

    सोलापूर : किरकोळ कारणावरून महिलेचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि.१७) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कर्णिक नगर येथे घडली. याप्रकरणी विरेंद्र दिलीप मस्के (वय ४०, कर्णिक नगर, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती लक्ष्मण माने, महेश लक्ष्मण माने, विद्या निवृत्ती माने, पूजा महेश माने, विमल लक्ष्मण माने (सर्व रा.कर्णिक नगर, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी वीरेंद्र मस्के व त्यांचा मित्र असे मिळून मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीचा मित्र असे दोघांनी फिर्यादीच्या घरासमोर राहणारे महेश माने यांच्या घराकडे पाहिले असा गैरसमज करून या संशयित आरोपींनी फिर्यादी वीरेंद्र मस्के यांना शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गजाने व लाकडी बांबूने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर संशयित आरोपी विद्या माने यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या आईचा गळा हाताने दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

    फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून तोडले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.